मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
भक्तत्राता परमेश्वर

श्रीदत्त भजन गाथा - भक्तत्राता परमेश्वर

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


गुरुवार ता. १३-११-१९३०

किती तुझी कृपा असे मजवरी । त्रैलोक्यांत सरी नाही नाही ॥१॥
तुजसम तूंच जगती कृपाळु । दीन कनवाळु तूंच एक ॥२॥
दीन हीन तुज शरण जे जन । त्यांचे सदवन करितोसी ॥३॥
कोठे असो तुझा भक्त कृपावंता । होसी त्यासी त्राता सर्वदाही ॥४॥
भूत भविष्य आणि वर्तमान तुज । सकळ महाराज विदित की ॥५॥
पुढील जाणोनि योजिसी उपाय । हरिसी अपाय स्वकीयांचे ॥६॥
तहानेला किंवा भुकेलासे दास । झळ ह्रदयास तुझ्या लागे ॥७॥
परोपरी किती भक्तां सांभाळीसी । किती अनुभवेसी बोलेन मी ॥८॥
विनायक म्हणे उपमा तुझीच । तुझलागी साच शोभतसे ॥९॥
==
भक्तत्राता परमेश्वर

मातेहुनि तुझे कोमल ह्रदय । किती तूं सदय अनुपम ॥१॥
कोणता दृष्टांत कोणती मी वाणी । योजू चक्रपाणी तुज गाया ॥२॥
तुजसम तूंच याहुनि अधिक । काय बोलूं निक भगवंता ॥३॥
आम्हांसाठी सदा रहासी तूं जागी । तुज जिवलगा काय बोलूं ॥४॥
उन्ह निवाराया कृपेची छ्त्रासी । शिरावरी धरिसी आमुच्या तूं ॥५॥
जे जे कांही आम्हां कष्टप्रद जगी । आपुल्याच अंगी घेसी नाथा ॥६॥
आमुचा भार तूं निज शिरावरी । वाहसी निरंतरी ओझेली तूं ॥७॥
ठायी ठायी करितोसी सुखसोई । सार्थ गुरुमाई नाम तुझे ॥८॥
कृतज्ञ हा झाला विनायक बाळ । तुझा लडिवाळ स्वीकारी तूं ॥९॥
==
भक्तत्राता परमेश्वर

चालतां मी चालतोसी । बसतां मी बसतोसी ॥१॥
हंसता मी हंसतोसी । रडतां मी रडतोसी ॥२॥
गोष्टी करितां गोष्टी करिसी । मजसवे तूं क्रीडसी ॥३॥
पाठी पुढे उभा अससी । कधी न मज तूं सोडिसी ॥४॥
झोपतां मी जागा राहासी । मजलागी संरक्षिसी ॥५॥
जड भारी पडतां मज । निवारीसी तूं सहज ॥६॥
उणे पडों मुळि न देसी । काय बोलूं मी तुजसी ॥७॥
भरुनि आले माझे ह्र्दय । तुझे धरीतसे पाय ॥८॥
अंतर्बाह्य साठविली । तुझी मूर्ति दत्ता भली ॥९॥
माझा होसी अनुचर । माझा सांगती तूं थोर ॥१०॥
प्रवासांत तूं प्रवासी । घरी असतां गृहवासी ॥११॥
ऊन्ह तहान सेवीतोसी । मजलागी सुखी ठेविसी ॥१२॥
काय बोलावे मी जाण । तुझे नाथ दयाघन ॥१३॥
विनायक चरणी लोळे । कृपाघन तूं त्या बळे ॥१४॥
==
भक्तत्राता परमेश्वर

मजसंगे जेवितोसी । मजसंगे निजतोसी ।
माझ्या मुखे जलपान । तुज नित्य दयाघन ॥२॥
जे जे कांही मज सेवन । ते ते तुज अनुसेवन ॥३॥
ऐशी आहे तुझी करणी । अपूर्व की चक्रपाणी ॥४॥
भुकेलो मी तूं भुकेला । तृषार्त मी तूं तान्हेला ॥५॥
ऐसे तुझे अनुकरण । मजसंगे नारायण ॥६॥
माझ्या ठायी मिसळोनी । एकरुप तूं होवोनी ॥७॥
राहतोसी माझ्यासंगे । रक्षितोसी मज निजांगे ॥८॥
किती बोलू अनुभव । माझेवरी कृपाभाव ॥९॥
विनायक निजदास । करी यासी तूं कृपेस ॥१०॥
==
भक्तत्राता परमेश्वर

मजलागी तुझे सहाय्य दत्तदेवा । माझीया वैभवा तोड नाही ॥१॥
माझा जो जो कांही संकल्प मनींचा । पुरविसी साचा दत्तात्रेया ॥२॥
प्राक्तनसंबंधी संकटे पडतां । मज उद्धरीता नित्य तूंच ॥३॥
तुज सर्व ठावे पुढे काय होणार । उपाय साचार योजीतोसी ॥४॥
पूर्वीच उपाय योजोनि ठेवीसी । मज संरक्षिसी सदोदित ॥५॥
विनायक किती बोलणार जाण । भरुनी अंत:करण येत असे ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP