मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
विनायकाचा संकल्प

श्रीदत्त भजन गाथा - विनायकाचा संकल्प

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


रंग देवा भरवावा । आम्ही द्यावा प्रेममेवा ॥१॥
बहुजन्माचे भुकेलो । भजनासी आर्त झालो ॥२॥
प्रमामृत लाभले न । आजवरी दयाघन ॥३॥
बहुजन्म वाया गेले । नाही सौख्य हे मिळाले ॥४॥
अमृताचा नाही झाला । लाभ कधी या जीवाला ॥५॥
प्रेमासाठी भुकेलासे । भजन तुझे मागतसे ॥६॥
आवडीने गाईन मी । देहभाव सांडीन मी ॥७॥
रंगी रंग भरीन मी । रंगोनिया जाईन मी ॥८॥
स्वर्ग करीन हा ठाव । आणिन वैकुंठ-वैभव ॥९॥
नाचवीन येथे देव । ऐसा माझा मनोभाव ॥१०॥
परब्रह्म लुटीन मी । पावेनचि सर्वस्वा मी ॥११॥
गांठिन वैभव शिखर । होऊन राहीन ईश्वर ॥१२॥
ऐसे आहे माझे ध्येय । म्हणुन धरीयेले पाय ॥१३॥
पराकाष्ठा माझी ऐसी । लुटवीन अमृतासी ॥१४॥
प्रेममय होईन मी । रंगवीन जनांसी मी ॥१५॥
देईन प्रेमानुभवासी । प्रेममय करिन त्यांसी ॥१६॥
करिन हेच वैकुंठ । माझी इच्छा अविकुण्ठ ॥१७॥
संकल्प विनायकाचा । सिद्ध करिल देव साचा ॥१८॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP