मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
देवकार्यासाठी धैर्य पाहिजे

श्रीदत्त भजन गाथा - देवकार्यासाठी धैर्य पाहिजे

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


गुरुवार ता. १०-४-१९३०
देवकार्य ज्यासी करणे नेटाने । खंबीर मनाने तेणे व्हावे ॥१॥
विघ्नालागी तोंड द्यावयासि लागे । बहु झटे मागे लागताती ॥२॥
कोणी परीक्षार्थ कोणी शत्रुत्वाने । कोणी मोठेपणे झुंजो येती ॥३॥
दृढ निश्चयसी धरोनियां कांस । वाहुनी कार्यास घ्यावे लागे ॥४॥
ममता देहाची किंवा संपत्तिची । न ठेववे साची त्यासी सदा ॥५॥
कधी उपवासी कधी अविश्रांत । क्रमावा  लागत मार्ग तया  ॥६॥
गिरिवने येती आडवी तयासी । झुंज सागरासी घडे त्याची ॥७॥
विनायक म्हणे जो कां धैर्यवन्त । सिद्धीला पावत तोच जगी ॥८॥
==
देवकार्यासाठी धैर्य पाहिजे
स्वामिकार्यासाठी प्राणही अर्पण । करायासी जाण सिद्ध जो का ॥१॥
सुखदु:खाचा की जयासी विसर । पाणी स्वार्थावर सोडियेले ॥२॥
तनुमन धन सर्व ईशार्पण । करुनीयां जाण झटणारा ॥३॥
तोच कार्य साधी तोच धन्य होई । धैर्य उडी घेई संकटांत ॥४॥
अग्निवरुनी चाले चढे पर्वतासी । गोष्पद सिंन्धूसी जो कां करी ॥५॥
शिरे विवरांत उडे आकाशांत । धैर्य झुंज घेत राक्षसांसी ॥६॥
भूत पिशाच्चांसी अंगावरी घेतो । शस्त्रांसी न भितो जो कां जाणा ॥७॥
निश्चयाने जो का पूर्ण वज्रदेही । मन न संदेही कधी ज्याचे ॥८॥
विनायक म्हणे तोच भाग्यवंत । निश्चये साधित देवकार्य ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : January 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP