मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
शुंभ-निशुंभ कथा

श्रीदत्त भजन गाथा - शुंभ-निशुंभ कथा

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


शुंभ-निशुंभानी देवां पराभवितां । गुरुसी तत्वतां शरण आले ॥१॥
गुरु सांगताती न दिसे उपाय । बहु प्रत्यवाय दिसताती ॥२॥
यज्ञयाग जरी कांही आचरावे । मंत्रांनी आणावे देव जरी ॥३॥
हविर्भाग जे का देव सेविताती । त्यांसी अधोगती प्राप्त आज ॥४॥
तुम्ही इंद्र चंद्र हविचे अधिकारी । निर्बळ झालां तरी असे आज ॥५॥
मग यज्ञयाग कैसा पावणार । कैसे सिद्ध होणार कर्म मग ॥६॥
विफ़ळ हे कर्म असे आता जाणा । दैवची प्रमाणा मानावे की ॥७॥
कोणी म्हणताती दैवची प्रमाण । उद्योग अप्रमाण म्हणताती ॥८॥
कोणी उद्योगासी प्राधान्याते देती । दोहोंसी म्हणती कोणी सेवा ॥९॥
उद्यम आणि दैव दोनीही प्रमाण । असे सप्रमाण वोलताती ॥१०॥
याच कारणे कांही उद्योग करणे । प्रशस्त शाहणे म्हणताती ॥११॥
तरी तुम्हांलागी उपाय कथितो । मज जो सुचतो आतां जाणा ॥१२॥
विनायक म्हणे सांगे उपासना । देवीच्या भजना बृहस्पती ॥१३॥
==
शुंभ-निशुंभ कथा

पूर्वी तुम्हां होती प्रसन्न जे झाली । भगवती भली जगदंबिका ॥१॥
तिने तुम्हां आहे दिधले वचन । कराल स्तवन जेव्हां माझे ॥२॥
तेव्हां मी पावेन शत्रु निर्दाळीन । तुम्हांसी देईन क्षेम जाणा ॥३॥
तरी तीच देवी तुम्ही उपासावी । प्रसन्न करावी सांगे गुरु ॥४।
विनायक म्हणे याच उपायाने । देव निजस्थाने पावले ते ॥५॥
==

म्हणोनी निष्कर्ष ऐसाच निघतो । उपाय सिद्ध होतो उपासना ॥१॥
उपासक जो का तोच मुक्त होय । त्याचे अंतराय नष्ट होती ॥२॥
चित्तशुद्धिद्वारे ज्ञान प्रकाशन । होतसे गहन देवकृपे ॥३॥
म्हणोनियां करा नित्य उपासना । देवाच्या भजना रात्रंदिन ॥४॥
तेणे इहपर सद्गती लाभाल । मोक्षाते जोडाल निश्चयाने ॥५॥
विनायक म्हणे हाच मथितार्थ । स्वार्थ परमार्थ साधताती ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP