मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
दत्तमयत्रिभुवन

श्रीदत्त भजन गाथा - दत्तमयत्रिभुवन

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


दत्तमय त्रिभुवन
गुरुमय संसार हा । करुनी तूं सुखें रहा ।१॥
क्षुधा तृषा गुरुमय । काम भोग गुरुमय ॥२॥
आहार विहार की सारे । गुरुमय करीं बारे ॥३॥
जगणे तूझे गुरुसाठी । नोहे विषयभोगासाठी ॥४॥
विश्रांगि तुज गुरुपाशी । करि त्याच्या चिन्तनासी ॥५॥
जीविंचा तो तुझा देव । विसावा तो गुरुदेव ॥६॥
प्राणाचा तो प्राण असे । तुजठायी वसतसे ॥७॥
त्रिभुवनी तोच आहे । विवेकाने त्यास पाहे ॥८॥
विनायक म्हणे भरला । ब्रह्माण्डांत देव भला ॥९॥
==
दत्तमय त्रिभुवन
प्रेमे करी कीर्तनाला । गाई त्याच्या चरित्राला ॥१॥
अनुबंध तेथे धरी । वर्णनाते रस भरी ॥२॥
यश गाई सदा त्याचे । भाजन ते अमृताचे ॥३॥
तन्मय होवोनिया राही । निजह्रदयी त्यास पाही ॥४॥
विनायक म्हणे रंग । करुनि होई त्यांत दंग ॥५॥
==
दत्तमय त्रिभुवन
दत्त दत्त ऐसे बोला । दत्तनामे नित्य डोला ॥१॥
ह्रदयांत दत्तनाम । करुनी वसो नित्य धाम ॥२॥
वसो नित्य श्रवणांत । वसो नित्य रसनेंत ॥३॥
नित्य वसो अंत:करणी । नित्य वदो तेच वाणी ॥४॥
दत्तनामाचा की छंद । त्यांत होवो तुज आनंद ॥५॥
दत्तनामे पूर्णकाम । तृप्ति येतसे परम ॥६॥
दत्त झगटे अंगासी । दत्त स्फ़ुरे ह्रदयासी ॥७॥
दत्तमय होय काया । शुद्ध नाही मग तया ॥८॥
अंतर्बाह्य दत्त होतो । दत्ताठायी प्रकाशतो ॥९॥
दत्तमय त्रिभुवन । ऐक्य जातसे होऊन ॥१०॥
विनायक दत्तमय । स्मरतां झाला त्याचे पाय ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP