श्रीदत्त भजन गाथा - दर्शन लालसा
श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.
गुरुवार ता. २३-१-१९३०
दर्शनाचा योग कधी घडणार । इच्छा पुरणार कधी माझी ॥१॥
कधी तुझे मुख नयनी पाहीन । वेडा मी होईन कधी सांग ॥२॥
वेडावेल मन कधी माझे दत्ता । संसारासी लत्ता हाणील ते ॥३॥
कधी तुझे ठायी मद्वृत्ति रंगेल । संगती घडेल कधी तूझी ॥४॥
कधी तूजला मी जिव्हेने चाटीन । नयनी प्राशीन रुपामृत ॥५॥
मधुरवाणी तुझी कानानी ऐकेन । तुज आलिंगीन कधीं देहे ॥६॥
कधी तूझे रुपीं सांग मिसळेन । कधी मी पावेन तुझा भाव ॥७॥
कधी प्रकाशसी माझे अंतरांत । कधी अवधूत पाहीन मी ॥८॥
कधी सुखावेन शांतिते पावेन । कधी शमवीन ताप सारा ॥९॥
कधी तूझी भेट कधी त्वद्दर्शन । कधी दयाघन योग ऐसा ॥१०॥
कधी माझेसवे देवा बोलशील । स्मित करिशील मधुर तूं ॥११॥
कधी दिव्यप्रभा मज दाविसील । कधी पहासील कृपेने तूं ॥१२॥
कधी माझे पाठीवरी तुझा कर । फ़िरेल उदार कधी सांग ॥१३॥
कधी मी पाहिन स्वरुप मोहन । अंतरी भरेन कधी सांग ॥१४॥
विस्मय पावेन पहात राहीन । राहे झगटोन चित्त दत्ता ॥१५॥
खिळवीन दृष्टी कधी तुझे ठायी । प्रेमा माझे ह्रदयी उचंबळे ॥१६॥
कधी तल्लीनता मनी प्राप्त होई । विरोनियां जाई मनोवृत्ती ॥१७॥
मधुर हास्य तुझे पाहतां पाहतां । कधी देहातीतता प्राप्त होई ॥१८॥
कधी दर्शनासी देसी भगवंता । कधी मनिंची आर्ता पुरवीसी ॥१९॥
विनायक म्हणे आतुर मी झालो । दर्शना भुकेलो तुझ्या नाथा ॥२०॥
N/A
References : N/A
Last Updated : January 07, 2020
TOP