मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
कोजागरी

श्रीदत्त भजन गाथा - कोजागरी

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


गुरुवार ता. १७/१०/१९२९
कौमुदी हे आज पौर्णिमा लक्षुमीची । आज्ञा हे शास्त्राची क्रीडा धरा ॥१॥
घेवोनीयां फ़ांसे आजचीये राती । क्रीडातां ये गति आनंदाची ॥२॥
अंगासि उटणीं लावोनि सुगंधी । वस्त्रें परमानंदी लेवावी की ॥३॥
अक्षक्रीडेलागी करिल त्या नरा । लक्ष्मी शुभवरा देत असे ॥४॥
वित्तं प्रयच्छामि अक्ष क्रीडणार्‍या । रात्री जागणार्‍या नरालागी ॥५॥
निशीथ काली वरदा लक्षुमी बघत । भूवर जागत कोण असे ॥६॥
देईन धन त्यासी करीन समर्थ । पुरवीन अर्थ सकळ त्याचे ॥७॥
अंभृण ऋषीची दुहिता हे ज्ञानी । संचरे त्रिभुवनी विमुक्त जी ॥८॥
समुद्रांतूनी येत क्रीडत बाहेरी । बोलत वैखरी अनुपम ॥९॥
रुद्रवसु आदित्य यांसह चरामि । सकळ धारयामि माझे ठायी ॥१०॥
इंद्राग्निवरुण अश्विनौ ते देव । सर्व माझा भाव जाणत की ॥११॥
सकळ जग मजठायी हे जाणावे । ब्रह्मरुप पहावें सदा मज ॥१२॥
उत्तम हवणी तैशा सोमरसे । यज्ञ यजीतसे यजमान ॥१३॥
त्याची फ़लदात्री मजला जाणावी । मजला गणावी याज्याहुती ॥१४॥
यज्ञ देवांमध्ये मीच श्रेष्ठ असे । विश्व पूजीतसे मजलागी ॥१५॥
जे जे कांही देव कर्म आचरिती । कर्तृत्व निश्चिती माझे सारे ॥१६॥
माझे मनी काम भक्तांसी रक्षावे । कर्तृत्व ऐकावे माझे तेव्हा ॥१७॥
सामर्थ्यवान त्यांसी तेव्हा मी करिते । क्नित्य संरक्षिते प्रियदासां ॥१८॥
ब्रह्मदेव त्यांसी करोनि ठेविते । सकळ त्यांसि देते सामर्थ्याला ॥१९॥
विष्णु शिव ब्रह्मा सकळ करिते । तयां बैसवीते ब्रह्मपदी ॥२०॥
माझे महात्म्य हे जो नर न जाणे । त्याची हानी होणे सर्वस्वाची ॥२१॥
म्हणोनियां मीच मुखे हे सांगते । ब्रह्मज्ञान कथिते तुम्हांलागी ॥२२॥
श्रद्धेने हे तुम्ही ब्रह्म परिसावे । तेणे धन्य व्हावे म्हणे देवी ॥२३॥
स्वतंत्र्य मी देवी विश्वाचे कारण । करीत निर्माण त्रैलोक्यासी ॥२४॥
असंग मी आहे तटस्थ मी आहे । चैतन्य रुप आहे मजलागी ॥२५॥
सकळ करोनी उदासीन आहे । ज्ञान कथिताहे ऐसे जाणा ॥२६॥
विनायक म्हणे संतुष्टेल रमा । सेवितां परमा वरदा जी ॥२७॥

N/A

References : N/A
Last Updated : January 05, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP