मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
भजनछंद

श्रीदत्त भजन गाथा - भजनछंद

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


गुरुवार ता. २/१/१९३०
दांभिकपण ऐसे मजठायी वसो । मज भीति नसो कोणाचीही ॥१॥
होवोनियां नाच्या नाचेन प्रेमाने । चंचाल ढंगाने तुजपुढे ॥२॥
नानावेषी नाथा नटेन रंगाने । कवन मुखाने गात तुझे ॥३॥
होवोनि निर्लज्ज चाळे मी करीन । उन्मत्त वागेन भजनांत ॥४॥
पतिव्रता नारी संभोग समयी । निर्लज्ज ह्रदयी होत जैसी ॥५॥
पतिसवे रमतां वेश्येसम वागे । सेवित निजांगे भर्त्यालागी ॥६॥
तैसा बजनरंगी नाचेन उडेन । तुज रिझवीन भजनाने ॥७॥
आनंदे डुलेन गीत मी गाईन । तुज मी घ्याईन ह्रदयांत ॥८॥
सोंग ढोंग ऐसे नित्य आचरेन । प्रिय मी होईन तुजलागी ॥९॥
तुझा दास जगी म्हणवीन जनी । माझिया भजनी प्रगट तूं ॥१०॥
स्वये प्रगटतां तूं श्री दत्तनाथा । मोठेपण समर्था मज येई ॥११॥
म्हणोनि प्रगटावे महत्व मज द्यावे । सिद्ध मज करावे कृपावंत ॥१२॥
विनायक म्हणे धरिली तूझी कांस । माझी आतां आस पुरवावी ॥१३॥
==
भजनछंद
छंद मज लागलासे । नाचण्याचा भक्ती मिसे ॥१॥
ढोंग माझे हे चालवी । आशा माझी हे पुरवी ॥२॥
मजसंगे नाच देवा । पूर्ण कर माझा हेवा ॥३॥
अंगी भरो माझ्या वारे । माझे ठायी तूं संचरे ॥४॥
येथे राज्य प्रेमाचेच । सुकाळ येथे प्रेमाचाच ॥५॥
देह ओवाळूनी टाकूं । मुख प्रकाम विलोकूं ॥६॥
तनुसी तनु भिडवोनि । सादरत्वे आलिंगोनि ॥७॥
एकजीव होऊनि जाऊं । समरस आम्ही होऊं ॥८॥
भजनाचे सुख किती । स्वर्गी सुर लाळ घोटिती ॥९॥
उपमा नाही नाही याला । सदा सेवूं भजनाला ॥१०॥
ढोंगी होऊनि लाज सोडूं । लौकिकासीं आम्ही मांडूं ॥११॥
लाचावले मन भारी । चटावली वृत्ति खरी ॥१२॥
कांही केल्या सुटेनाच  । भजन होय साच ॥१३॥
श्रीमंत कोण आम्हांसम । झालों आम्ही अनुपम ॥१४॥
वैकुठ येथे आम्हासाठी । येथे येतो जगजेठी ॥१५॥
किमया मज सांपडली । दत्तरुप काया झाली ॥१६॥
आला जो का अंगी स्वेद । काय सांगूं तो आनंद ॥१७॥
मी तो नाच्या जन्माचाच । किती केले आजवरी नाच ॥१८॥
लांडगा झालो वाघ झालों । कृमि कीटक बनलो ॥१९॥
पुरुष झालो नारी झालो । नपुंसक मी बनलो ॥२०॥
किती झाले माझे नाच । आतां हाच धरिला नाच ॥२१॥
विनायक दत्तमय । भजनाने खास होय ॥२२॥
==
धांवा
गुरुवार ता. ९/१/१९३०
आतां मज तारी करुणा तुज यावी । परीक्षा पहावी माझी न आतां ॥१॥
सत्वास उरेल कैसा तुझा दास । शक्ति कैची यास दत्तात्रेया ॥२॥
आतां उडी घाली मज दीनासाठी । स्वामि जगजेठी कृपावंता ॥३॥
तुजवीण आहे असहाय देवा । माझा असे केवा कोणालागी ॥४॥
कोण कळवळे कोण धांव घेई । वत्सा जैसी आई तैसा धांवे ।\५॥
आईसम तुझे नाते आम्हांपाशी । आतां दयाराशि धांव घेई ॥६॥
कोंडलो मी बहू कष्ट किती साहूं । साहायार्थ पाहूं कोणाकडे ॥७॥
कैवारी या कोण कोण माझा बाली । दया येई भली जयालागी ॥८॥
हांक मारितांच हांकेस धांवेल । मजला पावेल कोण ऐसा ॥९॥
तुजविण गति मज अन्य नाही । शरण आलो पाही तुझे पायां ॥१०॥
करुं नको मज आतां तूं उदास । पुरवी माझी आस दत्तात्रेया ॥११॥
भयभीत तुझ्या पाठीशी लपलो । बहु विश्वासलो तुझेवरी ॥१२॥
आतां माझे आई करुणेते करी । धांव तूं सत्वरी धांव घेई ॥१३॥
वाट किती पाहूं जागा किती राहूं । केव्हां सांग लाहूं दर्शनाला ॥१४॥
धांव आतां भेट उताविळ झालो । कासावीस झालो ह्रदयांत ॥१५॥
थरथर माझे ह्रदय कांपते । अढळ न राहते दृष्टी माझी ॥१६॥
काय करुं देवा बहुत दुखावलो । किती तळमळलो ह्रदयांत ॥१७॥
जळावीण मासा जेवी तदफ़डे । तैसेच हे घडे मजलागी ॥१८॥
कोठे जाऊं सांग कोणालागी सांगूं । कोणापाशी मागूं सांग आतां ॥१९॥
बाळपणापासोनी तुजला सेविले । तुजवरी ठेविले मन नित्य ॥२०॥
प्रामाणिकपणे सेविले तुजसी । धरोनी श्रद्धेसी दृढतर ॥२१॥
तरी आतां पाव मज गुरुराया । विश्रांति ह्रदया देई देई ॥२२॥
धांव धांव आतां अत्रिच्यानंदना । त्रैलोक्यवंदना धांव आतां ॥२३॥
तुजसम नाही कारुण्याचा सिंधू । कोणी न दीनबंधू पावे आतां ॥२४॥
धांव पाव आतां कैलासाधिपते । मज अनाथाते तारी तारी ॥२५॥
तारी तारी आतां संकटांतूनी या । मज धांवोनियां वांचवावे ॥२६॥
वांचवावे आतां मजला तारावे । मज नच द्यावे वैर्‍याहाती ॥२७॥
मज न मारावे कृपेने पहावे । मजसी करावे क्षमादोष ॥२८॥
चुकतो मी बहु आचरितो दोष । धरुं नका रोष स्वामिराया ॥२९॥
काय माता मानी बालकाचा दोष । काय करी रोष सांग दत्ता ॥३०॥
प्रामाणिक बुद्धि माझी तुज ठावी । तरी धांव घ्यावी माझ्यासाठी ॥३१॥
माझ्यासाठी आतां प्रगट या स्थानी । जैसा स्तंभातूनी प्रल्हादार्थ ॥३२॥
प्रगट आतां येथे दावीं साक्षात्कार । लीला चमत्कार दावी दावी ॥३३॥
करुं नको आतां मजला निराश । तुज जगदीश प्रार्थू किती ॥३४॥
किती परि तुज देवा मी ओळखू । किती मी विनवूं दयेसाठी ॥३५॥
लोळतो तुज पुढे घेतो लोटांगण । तरी नारायण कृपा करी ॥३६॥
गडबड माझी बहु झाली देवा । तरी आतां दावा निजमुख ॥३७॥
निजरुपी उभा येथे त्वां ठाकावे । मजलागी द्यावे दर्शनाला ॥३८॥
सायुध प्रगट मजसाठी दत्ता । प्रगट निजसत्ता येथे करी ॥३९॥
बोलण्याची झाली आतां माझी सीमा । तरी पुरुषोत्तमा धांव घेई ॥४०॥
उशीर बहु झाला मज झाली घाई । प्रगटोनि येई सत्वरेसी ॥४१२॥
उडी घाल आतां स्वामि जनार्दना । श्रीगुरु दयाघना उडी घाल ॥४२॥
संकट जाणसी माझ्या ह्रदयीचे । काय आतां वाचे बोलावे म्या ॥४३॥
जाणसी ह्र्दय जाणसी तूं मन । सर्वज्ञाची खुण कोण जाणे ॥४४॥
सर्वज्ञ तूं देव पाहूं नको अंत । आतां तूं त्वरित उडी घाल ॥४५॥
शरिरांतूनी माझे प्राण हे निघती । बाहेर पडती ऐसे वाटे ॥४६॥
घाबरलो देवा बहु श्रांत झालो । तुज शरण आलो काकुळती ॥४७॥
माझ्या विश्वासाचा माझ्या तूं धैर्याचा । जिवलग साचा तूंच माझा ॥४८॥
जिव्हाळ्याचा जीव तूंच सदाशिवा । आतां करुं धांवा किती सांग ॥४९॥
धांव धांव धांव धांव चक्रपाणी । धांव शूलपाणी माझ्यासाठी ॥५०॥
धांव त्रैमूर्ती सद्गुरुदत्तनाथा । चरणांवरि माथा ठेवितो मी ॥५१॥
हिडीस देखिले हिडीस ऐकिले । हिडीस अनुभविले किती सांगूं ॥५२॥
असत्याचा जय सत्याचा पराजय । ऐसा हा अन्याय पाहूं किती ॥५३॥
अधर्माचा होय थोर पुरस्कार । धर्म तिरस्कार किती होत ॥५४॥
सज्जनाचा छळ दृष्टासी बक्षिस । ऐसे किती खास पाहूं सांग ॥५५॥
इह्पर गति दाता भगवंत । ऐसे मी ऐकत निजकर्णी ॥५६॥
तरी आतां धांव दत्तदेवनाथा । निजसत्ता समर्था प्रगटवी ॥५७॥
संकटी सांपडलो उपाय नाही कांही । उरला मज पाही कृपावंत ॥५८॥
सर्वत्रची भय भरोनी राहिले । मन उबगले किती सांगूं ॥५९॥
उठ आतां दत्ता जागा होई दत्ता । कृपेने तूं दत्ता मज पाहे ॥६०॥
विनायक आला तुज काकुळती । तरी दत्तयति कृपा करी ॥६१॥


N/A

References : N/A
Last Updated : January 06, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP