मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
कृतज्ञता वचन

श्रीदत्त भजन गाथा - कृतज्ञता वचन

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


गुरुवार ता. १९/१२/१९२९
कार्य निज तुवां करवोनि घेतले । आम्हां यश दिले कृपावंता ॥१॥
आमुचीयासाठी येथे प्रगटोनि । कार्य करवोनि घेतले त्वां ॥२॥
आम्हां नाचविले आम्हां हर्षवीले । भजनी रंगवीले कृपासिन्धू ॥३॥
रंग केला बहु तुम्ही आम्हांसाठी । प्रेम असे पोटी तुमचीया ॥४॥
क्षणभरी येथे वैकुंठ आणिले । आम्हांसी दिधले दर्शनास ॥५॥
निज साक्षात्कार दाविला आम्हांसी । त्या उपकारासी काय बोलूं ॥६॥
ह्रदयाचा सखा जीविंचा तूं जीव । मूर्त प्रेमभाव दत्तात्रेया ॥७॥
कृपामूति परम तूंच एक नाथा । तुज मी समर्था काय वानूं ॥८॥
कृतज्ञतेने मी भरोनिया आलो । उभा मी राहिलो तुजपुढे ॥९॥
घेई आतां मज स्वामि पदरांत । चरण वंदित प्रेमभावे ॥१०॥
धन्य केले मज धन्य केले स्थान । धन्य केले जन भजले जे ॥११॥
प्रामाणिकपणे ज्यांही तुझी सेवा । केली दत्तदेवा धन्य तेच ॥१२॥
धन्यवाद ऐसा तुवां प्रगटविला । उपकार केला किती सांगुं ॥१३॥
किती पुण्य आम्हां जोडले न मिती । कृपेने श्रीपती तुझीयाच ॥१४॥
अनंतपुण्य आम्हां लाभले भजनें । तुझीया कृपेने दत्तदेवा ॥१५॥
अहोरात्र तुझ्या सेवेमाजि गेले । धन्य भाग्य भले आमुचे गा ॥१६॥
ज्यांही ज्यांही तूज सेविले अनंता । त्यांची कामपूर्तता करावी की ॥१७॥
कल्पवृक्ष म्हणुनि तुजपाशी आले । कामनेने भले जे का जन ॥१८॥
तयांचे तूं अर्थ पूर्ण करी नाथा । श्रीगुरु समर्था दत्तनाथा ॥१९॥
देह मन वाणी अमुची शुद्ध झाली । भजनी मिसळली त्रिकरणे ॥२०॥
धन्य ती इंद्रिये धन्य माझा देह । यांत न संदेह तिळमात्र ॥२१।
माझ्याठायी दत्त सदा स्थित आहे । ध्यानांत मी पाहे तयालागी ॥१२॥
ऐसा प्रभु माझे ठायी करी वास । माझीया देहास बागवी तो ॥२३॥
त्याचे इच्छे माझा देह वागतसे । गुणदोष नसे मज कांही ॥२४॥
गुणाचा न धनी न मी तो दोषांचा । मज दोषसाचा नाही नाही ॥२५॥
देह माझा अग्नि प्राण हिरण्यगर्भ । दत्ताचा संदर्भ माझे ठायी ॥२६॥
परब्रह्म तेच माझा आत्माराम । दत्तपूर्ण काम माझे ठायी ॥२७॥
जिवलग सखा माझा पाठीराखा । मज देत तोखा किती सांगुं ॥२८॥
विनायक म्हणे वर्णन दत्ताचे । त्याचे कृपे वाचे होत असे ॥२९॥

N/A

References : N/A
Last Updated : January 05, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP