श्रीदत्त भजन गाथा - वासुदेव चरित्र सार
श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.
गुरु माझे यतिवर । वासुदेव नामे थोर ॥१॥
त्यांच्या करीतो स्मरणा । आठवितो मी चरणां ॥२॥
दंड कमंडलू करी । छाटी भगवी पांघरी ॥३॥
भस्म असे सर्वांगासी । असे आश्रम संन्यासी ॥४॥
पायी शोभती खडावा । भिक्षवेष असे बरवा ॥५॥
वैराग्याचा मूर्त निधि । ज्ञानाचा तो महोदधिइ ॥६॥
तपश्चर्येची की मूस । तेज असे ज्या विशेष म॥७॥
तृप्तिचे हे प्रतिक की । मूर्ति शमाची हे लोकी ॥८॥
शांत दांत मुनि ऐसा । वर्णवेल वाचे कैसा ॥९॥
नित्य स्मित मुखावरी । प्रसन्न मुद्रा निरंतरी ॥१०॥
विकार नाही नाही मुळी । सामर्थ्याने आतुर्बळी ॥११॥
जन-पापांचा संहर्ता । भाविकांचा दीक्षाकर्ता ॥१२॥
जगद्गुरु ज्ञानदाता । कृपादृष्टी सर्वा पाहता ॥१३॥
क्षुधा तृषा नाही ज्याला । श्रम नाहीच देहाला ॥१४॥
चिंता नाहींच चित्ताला । चांचल्य ते न मनाला ॥१५॥
धैर्याचा जो पूर्ण मेरु । भक्तिचा जो क्षीरसागरु ॥१६॥
गांभीर्याचा जो सागर । उत्कृष्ट पुण्याईचे सार ॥१७॥
ऐसा माझा गुरुवर । वासुदेव यति थोर ॥१८॥
त्यासी अर्पितो अंतर । हेच माझे पूजा-सार ॥१९॥
स्मृति त्यांच्या पादुकांची । वृत्ति भक्ति-भावनेची ॥२०॥
हेच माझी सेवा आज । अर्पियेली पूजा काज ॥२१॥
तुष्ट व्हावे गुरुवर । द्यावा मज इष्टवर ॥२२॥
ज्ञानप्राप्ती मज व्हावी । माझी अविद्या नासावी ॥२३॥
पूर्ण काम जगी व्हावे । स्वातंत्र्येसी विचरावे ॥२४॥
प्रतिबंध मजलागी । नसो कोठेच या जगी ॥२५॥
वासुदेवे आपुला भाव । मज द्यावा अभिनव ॥२६॥
वासुदेव मी बनावे । इतरांसी ही करावे ॥२७॥
येईल जो जो माझ्यापाशी । साधावे मी तत्कार्यासी ॥२८॥
अभिष्ट त्याचे पुरवावे । वासुदेव बनवावे ॥२९॥
सकळांसी वासुदेव । करावे म्यां हाच भाव ॥३०॥
हेच माझे मागणे की । मुख्य एकचि अनेकी ॥३१॥
विनायक वासुदेव । दोघांचाही एक भाव ॥३२॥
N/A
References : N/A
Last Updated : January 16, 2020
TOP