मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
सत्यापरता नाही धर्म

श्रीदत्त भजन गाथा - सत्यापरता नाही धर्म

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


गुरुवार ता. ६-२-१९३०
सत्यासाठी प्राण त्यागावा हे व्रत । जरी सर्व घात पातला की ॥१॥
असत्याचा कधी अवलंब न करी ।  धैर्याते अंतरी धरावे की ॥२॥
दिले वचन जे कधी न टाळावे । सत्यप्रतिज्ञ व्हावे जगी सदा ॥३॥
थोर धर्मनिष्ठा थोर ईशप्रेम । निग्रह परम चित्तामाजी ॥४॥
इंद्रिये ताब्यात मन सदा वश । मळाचा न लेश बुद्धिमाजी ॥५॥
अतुल सामर्थ्य धीरोदात्त मूर्ति । ह्रदयी श्रीपति ध्याई सदा ॥६॥
ऐश्वर्याची नाही मुळीच वासना । जाळीली कामना मुळींहुनी ॥७॥
निश्वयाचा धड कधी न ज्यासी पड । भक्तीची आवड मोठी जया ॥८॥
मानसांत पूजी श्रीहरिची मूर्ति । चित्ती ज्ञान ज्योती प्रकशित ॥९॥
सुरवरां पूज्य पूज्य मानवांसी । पूज्य जगतासीं जो का सदा ॥१०॥
शत्रुमित्रांलागी वंद्य जो का नित्य । जयासि असत्य ठावे नाही ॥११॥
धैर्यशौर्याचा जो सागर केवळ । करील कवळ त्रैलोक्याचा ॥१२॥
ज्याचा धाक असे सर्व चराचरी । महात्मा भूवरी प्रसिद्ध की ॥१३॥
कुरु-पांडवांचा पितामह श्रेष्ठ । महिमा वरिष्ठ जगत्रयी ॥१४॥
गंगेचा नंदन शंतनुचा पुत्र । ज्याचे सत्यसत्र प्रख्यात की ॥१५॥
त्याचे सम व्हावे नित्य दृढव्रत । सहा पुण्यवंत बनावे की ॥१६॥
ज्याचीया स्मरणे बहु पुण्य जोडे । सुनिश्चय जडे आठविता ॥१७॥
जेणे पित्यासाठी केला भोग त्याग । वचनाचा भंग केला नाही ॥१८॥
गृह सुत दारा राज्य ऐश्वर्याचा । त्याग केला साचा पित्यासाठी ॥१९॥
पित्याच्या सुखासी आड न जो आला । त्याचा पुरविला जेणे काम ॥२०॥
भीष्मव्रत घ्यावे भीष्मासी स्मरावे । भीष्मरुप व्हावे त्याचे कृपे ॥२१॥
विनायक म्हणे भीष्मासम व्हावे । धैर्याने बनावे मेरुसम ॥२२॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP