मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
स्वधर्मे निधनं श्रेय: । परधर्मो भयावह:

श्रीदत्त भजन गाथा - स्वधर्मे निधनं श्रेय: । परधर्मो भयावह:

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


गुरुवार ता. ३१-७-१९३०

नेमुनिया दिली जीविका सर्वांसी । चारही वर्णासी ईश्वराने ॥१॥
जैसा ज्याचा असे अधिकार तैसे । साधन भरंवसे योजावे की ॥२॥
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रादिकां । जी उपजीविका नेमीयेली ॥३॥
त्याच धर्मे तेणे करावे आचारा । तैसे व्यवहारा संपादावे ॥४॥
दुजीयाचा धर्म सुलभ जरी तो । घातक होय तो आचरीतां ॥५॥
विगुणही धर्म जो असे आपुला । तोच आपुल्याला हितकर ॥६॥
पारक्यधर्माचा जरी शुभाचार । नव्हे सदाचार आपुल्याला ॥७॥
आपुला जो धर्म आपणां तो श्रेष्ठ । तोच बहु प्रेष्ठ मानावा की ॥८॥
मरण जरी आले स्वधर्माचे ठायी । तरी बहु प्रेष्ठ मानावा की ॥८॥
स्वधर्माने साधे जैसा परमार्थ । तैसा नोहे अर्थ इतरांनी ॥१०॥
परधर्म आहे पूर्ण भयावह । जाणा नि:संदेह अनर्थद ॥११॥
म्हणुनि स्वधर्मे साधावी जीविका । अनर्थकारिका परधर्मे ॥१२॥
परधर्मे होत स्वीय-जाति-च्युत । गति न पावत कोठलीच ॥१३॥
विनायक म्हणे स्वधर्मा भजावे । कधी न सेवावे परधर्मा ॥१४॥
==
स्वधर्मे निधनं श्रेय: । परधर्मो भयावह:
परमार्थ हेच मनुजासी ध्येय । कथिला उपाय त्याचेसाठी ॥१॥
श्रुतिस्मृतिशास्त्रे यानी नेमियेला । शुभाचार भला सकाळांसी ॥२॥
जैसी ज्याची योनि तैसा अधिकार । तैसाच आचार नेमीयेला ॥३॥
तया सदाचारे वागतां नरासीं । हानि भरंवसी येईनाच ॥४॥
म्हणोनि व्युत्क्रम कधि न करावा । जातिधर्म पाळावा सकळांनी ॥५॥
स्वधर्मे जीविका नर जो चालवी । तयाची थोरवी बहुतचि ॥६॥
तयाचे जे धन तेच न्यायार्जित । तेणेच विहित धर्माचार ॥७॥
श्रुति सांगे करा सदा दानधर्म । जयांचा धनागम न्यायार्जित ॥८॥
न्यायार्जित धन योग्य ते दानासी । तैसे ईष्टापूर्तीसी योग्य जाणा ॥९॥
न्यायार्जित नोहे जे का जाणा धन । न धर्मसाधन श्रुति बोले ॥१०॥
म्हणोनिया सदा स्वधर्मे चालावे । पारक्या सेवावे कधी नच ॥११॥
विनायक म्हणे धर्म जो आपुला । तोच आपुल्याला श्रेष्ठ असे ॥१२॥
==
स्वधर्मे निधनं श्रेय: । परधर्मो भयावह:

वरिष्ठ कनिष्ठां वृत्ती योजियेली । उदरपूर्ति भली तेणे करा ॥१॥
दुसर्‍याच्या धर्मे कधी न वागावे । न व्यभिचारावे प्राण गेल्या ॥२॥
व्यभिचार होतो प्राणासी घातक । जवळि नरक तये होतो ॥३॥
म्हणोनि रहावे स्वीय धर्मनिष्ठ । त्यापासोनी भ्रष्ट होऊं नये ॥४॥
अधमाने कधी उत्तम-जाति-कर्म । करुं नये वर्म हेच जाणा ॥५॥
श्रुतिने दण्डक ठरविला त्यासी । त्याचीये धनासी नृपे घ्यावे ॥६॥
निर्धन करोनी तया देशपार । राजये साचार घालवावे ॥७॥
वरिष्ठे करितां परधर्माचार । पातित्य साचार येते त्याला ॥८॥
दण्डक हे जाणा पाळावे स्मृतिचे । चळूं नये साचे कधी कोणी ॥९॥
विनायक म्हणे स्वधर्माने हित । होईल खचित निश्चय हा ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : January 16, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP