श्रीदत्त भजन गाथा - गुरुकार्यासाठी स्वार्थत्याग
श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.
गुरुवार ता. ६-३-१९३०
देव कार्यासाठी तन मन धन । सदैव अर्पून झटावे की ॥१॥
अशक्य शक्यांचा विचार नसावा । विश्वास धरावा गुरुपदी ॥२॥
बळे उडी घाला संकट पातल्या । जीविता आपल्या भिऊं नका ॥३॥
देह पडो राहो गुरुकार्य साधा । परिकर बांधा दृढ सुज्ञ ॥४॥
अग्निवरोनियां चालणे जरी आले । पाहिजे चालले गुरुकार्यी ॥५॥
समुद्रांत उडी घ्यावया धजावे । परी कार्य साधावे गुरुजींचे ॥६॥
ममता देहाची पुत्रदारादींची । धरुं नये साची गुरुकार्यी ॥७॥
क्षण हे जीवित भंगुर संसार । लोभातें साचार धरुं नका ॥८॥
धैर्यशाली वीर होवोनि झुंजावे । मार्गे न राहावे प्राण गेल्या ॥९॥
गुरुकार्या कधी विन्मुख न व्हावे । शीर्यपटु व्हावे तेथे सदा ॥१०॥
विनायक म्हणे उत्साह धरावा । कधी न भंगावा प्राणांतीही ॥११॥
==
गुरुकार्यासाठी स्वार्थत्याग
गृहसुतदारा पशुधन यांची । सांड करी साची गुरुकार्यी ॥१॥
देहावरी ठेवी धैर्ये तुलसीपत्र । तेणे इहपरत्र गति तूज ॥२॥
सकळ इंद्रियांचा न्यास गुरुकार्यी । धैर्य तूं ह्रदयी धरुनी करी ॥३॥
क्षुध्हा तृषा सर्व विसरोनि जाई । द्वन्द्वमुक्त होई गुरुकार्यी ॥४॥
मन कर सारे गुरुकार्यमय । बुद्धि गुरुमय करी बारे ॥५॥
विनायक म्हणे सद्गुरुचा दास । न भिये कोणास कल्पान्तींही ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : January 07, 2020
TOP