मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
अन्न

श्रीदत्त भजन गाथा - अन्न

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


गुरुवार ता. १८-९-१९३०

अन्न हाचि देव अन्न हेच ब्रह्म । अन्न परंधाम परमात्मा ॥१॥
अन्नमय सर्व विश्व हे जाणावे । अन्नासी पूजावे प्रियभावे ॥२॥
कधीही अन्नाला ठेवूं नये नांव । तेणे होतो देव रुष्ट जाणा ॥३॥
अन्नमय देह अन्नमय प्राण । अन्न नारायण जाणावा की ॥४॥
अन्न हेच जाणा सकळ महत्व । अन्न हे जीवित्व सकळांचे ॥५॥
अन्नलागी नाही कोठेही उपमा । तया पुरुषोत्तमा भजावे की ॥६॥
विनायक म्हणे अन्न परब्रह्म । करी पूर्णकाम सेवी त्यासी ॥७॥
==
अन्न

जे जे कांही मूर्त अमूर्त जगांत । अन्नचि वर्तत जाणावे की ॥१॥
सकळ शरीरं अन्नाची बनली । अन्नेच पोसली अन्नमय ॥२॥
एक होतो अन्न जया दुजीयाचे । अन्नत्व त्या साचे तिसर्‍याचे ॥३॥
अन्न अन्नाद हे सकळ जगांत । ब्रह्म हे वर्तत ह्याच रुपे ॥४॥
अन्नापासोनियां सकळ भूतसृष्टी । होत असे तुष्टी अन्नयोगे ॥५॥
उत्पत्ति स्थिति लय सकळ अन्नांत । अन्नचि बनत सर्व काही ॥६॥
म्हणोनिया अन्नद्वेष न करावा । अन्नाचा न व्हावा निंदायोग ॥१०॥
अहोरात्र करा पूजन अन्नाचे । भजन अन्नाचे सदोदित ॥११॥
प्रथम उपासना करितां अन्नाची । वाट परब्रह्माची सांपडते ॥१२॥
विनायक म्हणे अन्नाचा संग्रह । करा नि:संदेह विश्वासाने ॥१३॥
==
अन्नोपासनेची महती

कोणासींही अन्न कधी न नाकारावे । प्रयत्नाने द्यावे सत्कारेसी ॥१॥
बहुमानपुर:सर अन्न द्यावे । सकळां करावे तृप्त अन्ने ॥२॥
अन्न मेळवावे अन्न साठवावे । सकळां वांटावे प्रेमभरे ॥३॥
जो जो कोणी येई अतिथ घरासी । अन्न हे तयासी द्यावे माने ॥४॥
सन्मानोनी अन्न द्यावे कोणासीही । प्रसन्न होत पाही देव तुज ॥४॥
जो का अन्नदाता तया मृत्यु येतां । परब्रह्मसत्ता पावत तो ॥६॥
विनायक म्हणे अन्न उपासना । तुज भोग नाना देत असे ॥४॥
==
अन्नोपासनेची महती

अन्नदाने तुज सर्व काम सिद्धि । होत परमर्द्धि तुज प्राप्त ॥१॥
अन्नाचीयायोगे विश्वसंतर्पण । करितां नारायण दूर नोहे ॥२॥
अन्नरुपी आहे जाणा जनार्दन । अन्नेच पूजन करा त्याचे ॥३॥
समृद्ध अन्नाने आपण बनावे । सर्वाभूती द्यावे अन्न जाणा ॥४॥
कृमिकीटकादि पिपीलिका जीव । तयां तृप्ति भाव अन्ने द्यावा ॥५॥
अन्ने आराधन करावे विश्वाचे । तेणे ब्रह्म साचे संपादत ॥६॥
सकळांचा ऐसा जो का अन्नदाता । तोच परमात्मा बनती तूं ॥७॥
विनायक म्हणे अन्नमहिमान । करील वर्णन कोण त्याचे ॥८॥
==

अन्नअन्नादांसी विचारे जाणावे । तयां ओळखावे सर्वाठायी ॥१॥
शरीरांमध्ये प्राण प्राण शरीरांत । दोघे अन्न होत अन्नादही ॥२॥
सलिलांत अग्नी अग्नीत सलिल । दोहोंची मिसळ ऐशी असे ॥३॥
अन्न अन्नाद ते दोघेही बनती । ऐशी चमत्कृति विश्वाठाय़ी ॥४॥
पृथ्वी आकाशांत पृथिवींत नभ । विचार सुलभ ऐसा आहे ॥५॥
अन्न अन्नाद हे एकचि असती । अनुभवा येती एकरुप ॥६॥
अन्वयव्यतिरेकी ब्रह्मचि उरत । सर्व मावळत साकार जे ॥७॥
म्हणोनियां म्हणे विनायक सेवा । मार्ग हा बरवा अन्नोपास्ति ॥८॥
==
अन्नोपासनेची महती

पितरांच्या नांवे करा अन्नत्याग । तेच यथासांग सेवन की ॥१॥
बहु सत्कारोनी अन्न भूतमात्रां । घालितां परामात्रा सापडत ॥२॥
तृप्त होतां जीव होय समाधान । तेणे अंतर्ज्ञान प्रगटत ॥३॥
म्हणोनी पहिली हेच उपासना । श्रुती सर्व जनां लावीतसे ॥४॥
सगुण साक्षात्कार प्रथम जो होय । तोच अन्नमय जाणावा की ॥५॥
म्हणोनियां यज्ञ श्रुतिने कल्पियेले । तृप्त करणे भले सकळांसी ॥६॥
विनायक म्हणे अतिथिसत्कार । हेच सर्व सार अन्नयोगे ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP