श्रीदत्त भजन गाथा - भक्ताभिमानी देव
श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.
गुरुवार ता. २७-३-१९३०
अभिमान कोणा तुजविण दत्ता । कोणा असे सत्ता त्रैलोक्यांत ॥१॥
कोण आतुर्बळी सांग तुजवीण । करिल रक्षण कोण ऐसा ॥२॥
यमाचे छातीत कोण लत्ता मारी । काळाते संहारी कोण सांग ॥३॥
कोण भक्तालागी पाठीसी । कोण कळवळेल तुजवीण ॥४॥
भक्तासाठी कोण होईल घाबरा । तुजविण उदारा सांग मज ॥५॥
द्रौपदीची निरी स्पर्शतां दुष्टाने । उताविळ मने कोण झाला ॥६॥
कोण झाला वस्त्रे जडरुपसांग । झांकियेले अंग कोणे तेव्हा ॥७॥
पाण्डव वधास्तव दुर्वासा पातला । मध्यरात्री भला कारणिक ॥८॥
दुर्योधने केली होती शिकवण । कोपिष्ट दारुण पातला तो ॥९॥
शापे भस्म करायासी पाण्डवासी । सत्व हरायासि सुनि आला ॥१०॥
तेव्हां कोण सांग कळवळला देव । अन्नाचा वर्षाव कोणी केला ॥११॥
कोण अन्नरुप बनला तेधवां । प्रेमाच्या वैभवा प्रसवला ॥१२॥
विनायक म्हणे कैवारी भक्तांचा । तुजविण साचा कोण जगी ॥१३॥
N/A
References : N/A
Last Updated : January 07, 2020
TOP