मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
कृतज्ञता वचन

श्रीदत्त भजन गाथा - कृतज्ञता वचन

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


(प्रवचनांत केलेले अभंग )
कोण बावाचे बोलेल वर्णन । अशक्य दयाघन मज वाटे ॥१॥
कृपेचा अनुभव मुखे बोलवेना । तुज दयाघना सांगूं काय ॥२॥
भरोनियां आले माझे हे ह्रदय । तुझे शिरी पाय धरीतो मी ॥३॥
मनाने लोळतो तुझे पायावरी । सुख ते अंतरी किती सांगूं ॥४॥
वाचेचा तो नोहे बा विषय । जाणील ह्रदय अनुभावे ॥५॥
विनायक म्हणे कृतज्ञ मी देवा । तुज वासुदेवा शरण आहे ॥६॥
==
कृतज्ञता वचन
लडिवाळपणे देवा मी बोलतो । भाव कळवितो माझा तुज ॥१॥
जननीहुनी थोर नाते तुझे देवा । त्या प्रेमानुभवा काय बोलूं ॥२॥
सांपडला ठाव आधार मिळाला । मज अनाथाला वासुदेवा ॥३॥
विनायक म्हणे केला त्वां बनाव । माझे मी वैभव काय बोलूं ॥४॥
==
कृतज्ञता वचन
पुन्हां पुन्हां किती बोलूं अनुभव । ह्रदयींचा भाव उचंबळे ॥१॥
अमृताचा करी वर्षाव ह्रदयी । सुखस्पर्श होई ह्रदयाला ॥२॥
सुखमय होत दृष्टीचा विषय । विचारांसी होय प्राप्तदिशा ॥३॥
सुखाचा विचार सुखाचा तरंग । होतसे अभंग ह्रदयांत ॥४॥
सुखाची जे सोय मज प्राप्त झाली । बोलावी ती भली काय आतां ॥५॥
विनायक म्हणे कृतज्ञ बनोनी । चरण तुझे दोन्ही शिरी घेत ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP