(गीति)
काशीराजा आला, नगरामाजी विनायकासहित ।
ऐकुन दुसरे दिवशीं, तेथिल ब्राह्मण नृपाकडे येत ॥१॥
वेदामध्यें तैसा, शास्त्रांमाजी प्रवीण ब्राह्मण तो ।
होतें नाम तयाचें, प्रथित असें धर्मदत्त भिक्षुक तो ॥२॥
कश्यपपुत्र कुठें तो, पुशिलें त्यानें नृपास ते समयीं ।
क्रीडेसाठीं गेला, कळलें त्याला खचीत ते ठायीं ॥३॥
कश्यपपुत्र असे तो, मम मित्राचा सुपुत्र कीं आहे ।
भेटी त्याची घेउन, हातीं धरुनीच नेत लवलाहें ॥४॥
ऐकुन कीर्ति तुझी मीं, तुजला सदनास नेत आवडिनें ।
सदनीं येऊन बाळा, पुनित करीं सर्वही पदरजानें ॥५॥
(साकी)
धर्मदत्त हा विनायकाला सदनीं नेता झाला ।
मार्गामध्यें घात कराया पाठवि दो असुरांला ॥६॥
धृ०॥सुन सुन हें कथन भूपा दे अवधान ।
काम क्रोध हिं असती नामें परस्परें ते लढती ।
लढतां लढतां विनायकाच्या अंगावरि ते पडती ॥७॥
पाहुन बाळें बहु भीतीनें जाती पळोन सदनीं ।
कश्यपनंदन ठाके तेथें हलला नाहीं मानी ॥८॥
दोनी राक्षस पायीं धरिले भूवर ते आपटिले ।
प्राण निघोनी गेला त्यांचा विप्र विनायक चाले ॥९॥
इतुक्यामध्यें मार्गावरि तो हत्ति भयानक दिसला ।
चाल तयाची जाणुन त्यानें हस्त सोडुनी दिधला ॥१०॥
विनायकानें उडी मारिली गंडस्थळिं कीं छान ।
अंकुश टोंचुन प्राण हरोनी मृत्यूसी अवदान ॥११॥
पडला होउन राक्षस तेथें छातीवरि तो बसला ।
लोक पाहती धर्मदत्त त्या सदनीं नेता झाला ॥१२॥
विघ्ननिवारण झालें म्हणुनी धर्मदत्त त्या पूजी ।
धूम्राक्षाची पत्नी जंभा उत्तम नटली ताजी ॥१३॥
तेथें येउन विनायकाचें शौर्य वर्णिलें फार ।
झालें दर्शन म्हणुनी मजला मोद जाहला फार ॥१४॥
ऐसा बालक ज्याचे उदरीं जन्मा येई त्याचें ।
भाग्य खरोखरी शंका नाहीं बोलतसे ती वाचें ॥१५॥
मुला तुवां जो आज पराक्रम केला आहे भारी ।
कष्ट जाहले यास्तव स्नेहें आंग रगडिते श्रम हारी ॥१६॥
उष्णोदकिं तें स्नान घालितें इच्छा झाली मजला ।
पूर्ण करी तूं ऐकुन विनती प्रार्थितसे ती अबला ॥१७॥
(भुजंगप्रयात्)
विनंती करी मान्य तो आबलेची ।
करीं घेतलें वीष तें स्नेह तेंची ।
विषें मर्दिलें प्रेम तें दाखवीत ।
असें पाहुनी लोक ती आदरीत ॥१८॥
परंतू घडे कीं चमत्कार थोर ।
नसे बाधलें वीष देहास हेर ।
तिचे अंगिं तें बाधलें वीष सारें ।
तिचें अंग तें दाहलें पूर्ण सारें ॥१९॥
सुरानंद तो ऊचली नारळाला ।
तिच्या मस्तकीं मारिला त्याच वेळा ।
शिरीं वाहतें रक्त तें पाट जैसा ।
पडे देह विक्राळ तेथेंच तैसा ॥२०॥
(गीति)
जृंभा मरुन गेली, काशीराजा प्रवेशता झाला ।
हय गज आदि करुनी, वहनें आणून नेतसे त्याला ॥२१॥