मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|
अध्याय १२

क्रीडा खंड - अध्याय १२

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

कश्यपपुत्र विनायक, झालीं वर्षें तयास तीं सात ।

आला आश्रमिं तेव्हां, काशीराजा बघून ते येत ॥१॥

काशीराजा येतां, कश्यप देई तयास भेटीस ।

झाला मोद तयांना, आसन दिधलें त्वरीत भूपास ॥२॥

षड्रसयुक्त असें दे, भोजन राजास तेधवां मधुर ।

कश्यप म्हणति तयाला, किमर्थ येणें मला कथीं चतुर ॥३॥

राजा तुझा पुरोहित, असुनि मला तूं बहूत दिवसांनीं ।

स्मरणें करुन भेटसि, कारण कथणें खरोखरी सु-मनीं ॥४॥

आतां अलीकडे तूं, अमुच्या क्षेमास घेत नाहींस ।

आश्चर्य मला वाटे, कारण कथणें खरोखरी खास ॥५॥

राजा उत्तर देई, गुंतुन पडलों स्वकार्य-व्यवसायीं ।

येणेंकरुन मजला, बहु दिन झाले न फावलें समयीं ॥६॥

आहे मत्पुत्राचा, विवाह म्हणुनि स्वतांच मुळ ये मी ।

तेव्हां कश्यप वदले, चातुर्मास्यार्थ याग तिथि नेमी ॥७॥

यास्तव येणें मजला, साधत नाहीं म्हणून मम सूत ।

घेउन जाईं राजा, कार्य करीं तो यथाविधी उचित ॥८॥

कश्यप म्हणणें त्यानें, मान्य करुनियां विनायकासह तो ।

चढला रथावरी तो, वंदुनि त्यांना हकीत वाजी तो ॥९॥

(पृथ्वी)

तयांस पथिं लागलें विपिन रम्य तें शांतसें ।

वसंत चुलता तिथें तप करी यथातथ्यसें ।

असें असुर तें बहू कठिण कीं पुरें निग्रहें ।

असें प्रथित त्या तया परिच नाम ’धूम्राक्ष’ हें ॥१०॥

सुवृक्ष वनिं देखुनी उलट टांगुनी घेतलें ।

सहस्त्रदश अब्द हें तप करी धुरा सेविलें ।

रवीस यजिलें असे बहुत निश्चयें राक्षसें ।

प्रसन्न रवि जाहले वरित देत शस्त्रां असें ॥११॥

(शार्दूलविक्रीडित)

धूम्राक्षें यजिलें रवीस समरीं संहार शत्रू करी ।

ऐसें शस्त्र मिळो म्हणूनि तप हें दारुण तेथें करी ।

वृक्षासी उलटें पदांस ग्रथिलें व्हावें मला प्राप्त तें ।

हें सारें जग कीं म्हणून असलें दारुण केलेंच तें ॥१२॥

(गीति)

सूर्यापासुन येई, शस्त्र असें तें सतेज वेगानें ।

धरिलें विनायकानें, धूम्राक्षा मारिलें असे त्यानें ॥१३॥

धूम्राक्षाचे सुत ते, जघन मनू हे वनांत ते दोन ।

जनकाच्या सेवेला, येती दिसला पिता पडे मरुन ॥१४॥

क्रोधें वनांत बघतां, काशीराजा विनायकासहित ।

दिसला त्यांना तेथें, वदले भूपास तेधवां सूत ॥१५॥

अमुचा चुलता आहे, नाम नरांतक वधी तुला जेव्हां ।

रक्षण केलें जनकें, विसरे उपकार कीं वनीं एव्हां ॥१६॥

आतां जीव कसा हा, वांचविशी हे तदीय सुत दोघे ।

बोलति ऐकुन राजा, वदला हें ऐकतीच ते दोघे ॥१७॥

माझे सदनीं आहे, मग पुत्राचा विवाह यासाठीं ।

अणिलें कश्यपपुत्रा, कुलगुरु अमुचा म्हणून यासाठीं ॥१८॥

तुमचा जनक वधाया, आणिलें नाहीं असेंच मी सांगें ।

इच्छा तुमची असली, शिक्षा करणें तयांस तो सांगे ॥१९॥

मांजर उंदिर पाहुन, धांवे तैसेच धावती दोघे ।

तेव्हां महोत्कटानें, गर्जुन श्वासें उडून ते दोघे ॥२०॥

गेले नरांतकाच्या, नगरामाजी गृहावरी पडले ।

चुरलीं गृहें म्हणूनी, झाला कल्लोळ वृत्त हें कळलें ॥२१॥

क्रोधें करुन त्यानें, सहस्त्र सेना त्वरीत पाठविली ।

आणा महोत्कटासह, आज्ञा सेनेस कीं अशी दिधली ॥२२॥

आली सेना जवळी, सोडी श्वासास तो तसा त्वरित ।

भीषण शब्द करुनियां, राक्षससेनेस होय उडवीत ॥२३॥

दाणादाण अशी ती, मुकली पडली बहूत पळवीली ।

शीर्षे फुटलीं बहु तीं, पोटें फुटलीं पदांत मोडियलीं ॥२४॥

उरलीसुरली गेली, धडपड करुनी नरांतकापाशीं ।

सांगे वृत्त तयाला, ऐके राक्षस सखेद स्थिति ऐशी ॥२५॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP