(गीति)
इंद्रा थप्पड मारुन, भूमीवर त्यास पाडिलें आधीं ।
नंतर कुबेर वरुणा, आदि करुनियां बहूत देव वधी ॥१॥
विष्णूच्या हस्तींचे, पाडी चक्रास चक्र सोडून ।
नंतर गदेंकरुनी, ताडित शिरसा सुलक्ष देऊन ॥२॥
सिंधूनें दंतांनीं, केले तुकडे त्वरीत चावून ।
पाहें पराक्रमाला, विष्णू बोले प्रसन्न होऊन ॥३॥
मागें वर तूं आतां, विष्णु म्हणे सिंधुसी बहू मोदें ।
सिंधू वदे हरीला, राहें जाऊन गंडकीं मोदें ॥४॥
मान्य करी सिंधूचें, वश केला विष्णु कीं बहू वीर्ये ।
कैलास सत्य-लोकीं, फिरवीं दृष्टी त्वरीत बहु वीर्ये ॥५॥
तेथें राज्य कराया, दैत्यांना नेमिलें असे त्यानें ।
इंद्रा हरीस घेउन, सिंधू गेला त्वरीत वेगानें ॥६॥
नगरांतुनी हरीला, कोठें जाऊं नये अशी आज्ञा ।
दिधली तशीच असुरां, हरिवरि ठेवा सुलक्ष दे आज्ञा ॥७॥
नंतर अवनीवरि तो, पाठवि दैत्यांस तेधवां सिंधू ।
पूजूं नयेच देवां, धेनू विप्रादि छळितसे सिंधू ॥८॥
पूजावें सर्वांनीं, मजला सुर मानुनी अशी आज्ञा ।
केली प्रथीत त्यांनीं, जगतावरि असुर हिंडुनी आज्ञा ॥९॥