(गीति)
शिबिरीं देवांतक तो, होता भ्रांतींत तों उषःकालीं ।
गेला विनायक प्रभु, अवचीतचि तो तदा कालीं ॥१॥
असुरा विचार करण्या, संधी न मिळे त्वरीत शिशुसम कीं ।
अंकावरी तयाला, घेउन वदला स्मरे वरा मनिं कीं ॥२॥
असुर धरी तो दंता, मोडुन आला हतांत तो दंत ।
त्यासह अवनीवरि तो, असुर पडे तेधवां हरी दंत ॥३॥
तो दंत मस्तकावरि, मारियला कीं त्वरीत लीला ही ।
झाले सहस्त्र तुकडे, देहांतुन तेज तें प्रभू देहीं ॥४॥
शिरलें तेज बघूनी, संकट हरिलें म्हणून देवांनीं ।
स्तविलें विनायकाला, उपेंद्र नामें करुन त्या स्तवनीं ॥५॥
नंतर ऋषीगणांनीं, पूजन करुनी प्रभूस नाम दिलें ।
धरणीधर प्रेमानें, घेउन प्रभुंनीं सुरांस तोषविलें ॥६॥
नंतर पूजा करिती, भूपति सारे यथाविधी प्रभुचें ।
हृषिकेश नाम ऐसें, देउन चरणीं नमीत ते साचे ॥७॥
नंतर काशीराजा, पूजन करण्यास होतसे सिद्ध ।
दैत्यवधार्थ स्वरुपा, त्यजुनी झाला प्रभू स्वतां शुद्ध ॥८॥
भूपति गणपति दोघे, आलिंगिति कीं परस्परें मोदें ।
नेत्रीं बाष्प तयांचे, येती पाहून पुरस्थजन मोदें ॥९॥
येथें विनायकाचा, झाला अवतार तो पुरा खास ।
नमितों कवी तयासी, सद्भावें हो सुलीनसा दास ॥१०॥