(गीति)
मुद्गल-वाणी परि ती, राजाची संपली असे मुदत ।
होती शुद्ध चतुर्थी माघांतिल भौमवार ही उचित ॥१॥
प्रातःकाळी भूपें, स्नानादी सारिलीं विहित कृत्यें ।
गणपतिपूजन केलें, केलीं गमनास योग्य हीं कृत्यें ॥२॥
भेटीसाठीं रायें, मेळविले विप्र मित्रही सकळ ।
तैसेच आप्तइष्टां, आणविले मंदिरांत ते सकळ ॥३॥
भेटी झाल्या नंतर, भूप बघे वाट त्या विमानाची ।
गमनीं उत्सुक झाला, प्रभु इच्छी भेट ही नृपाळाची ॥४॥
अपुल्या लोकीं अणण्या, दूतांसी पाठवी त्वरें देव ।
घेती विमान संगें, आले मादें प्रमोद भरधांव ॥५॥
काशीराजा बैसे, भव्य सभामंडपीं सभे सहित ।
दूतहि आले तेथें, कथिती राजास तेधवां वृत्त ॥६॥
अमुचे प्रभू तुम्हांसी, आठविती फार फार कीं स्मरणें ।
अपुले समान भक्तचि, त्रिभुवनिं नाहीं खरोखरी मिळणें ॥७॥
देव-गजानन होते, बालक-रुपी तुम्हां घरीं राया ।
भक्ती जडली तुमची, यास्तव नेण्यास पातलों राया ॥८॥
आणिलें विमान येथें, ऐकुन रायें प्रधान आव्हानीं ।
स्वाधिन केलें राज्या, रक्षावें राज्य हें स्वधर्मांनीं ॥९॥
ऐहिक-देहें चढला, भूप त्वरें तो विमान हर्षानें ।
रविसा देह तयाचा, चढता झाला प्रभू कृपा यानें ॥१०॥
चाले विमान तेव्हां, काशीराजा बघे अधीं लोक ।
फिरती यानाभोंतीं भूतें, प्रेतें पुसे कवण लोक ॥११॥
रायासी म्हणती ते, या लोका भूतलोक हो म्हणती ।
नंतर दिसले राक्षस, या लोका असुरलोक हो म्हणती ॥१२॥
श्रौतास्मार्तादिकही, कर्मे त्यजिती तयांस हा लोक ।
होतो प्राप्त म्हणूनी, कथिती भूपास तो तिजा लोक ॥१३॥
गंधर्वलोक दिसला, भू रत्नांनीं प्रयुक्तशी होती ।
सदनें सुवर्ण होतीं, नर-नारी निपुण गायनीं होतीं ॥१४॥
पाहुन लोक असा तो, हर्षित झाला नृपाळ हे व्यासा ।
गूहक चारण सिद्धहि, यक्षादी लोक पाहतो खासा ॥१५॥
दूतांनीं भूपाला, अमरावति सर्व नगर दाखविलें ।
भूप म्हणे त्या दूतां, पूर्वी श्रविलें तसें मला दिसलें ॥१६॥
अग्नीपूजक यांना, योग्य असा अग्निलोक भूपा हे ।
पाप्यांना योग्य असा, वैवस्वतलोक भूप हा पाहें ॥१७॥
तेथिल प्रकार पाहुन, मिटिले नयनांस तेधवां रायें ।
सत्वर म्हणे चला तो, दूतांना ज्ञापिलें असें रायें ॥१८॥
इंद्राचा लोक तसा, दुसरा पाहे कुबेरलोक पुढें ।
वरुणाचा वायूचा, रविचा तैसाच चंद्रलोक पुढें ॥१९॥
गोलोक सत्यलोकचि, ऐसे पाहे अनुक्रमें लोक ।
वैकुंठ लोक पाहे, रमला तेथें नृपाळ हें ऐक ॥२०॥
पुढती शिवलोकातें, अवलोकी भूप तो पुढें चाले ।
जिकडे तिकडे दिसले, अंधःकार प्रयुक्त जग झालें ॥२१॥
तेजोमय यानानें, अंधःकारी असून नच गमलें ।
पुढती विमान चाले, अद्भुतसें भूपतीस हें दिसलें ॥२२॥
ब्रह्माण्ड गिळी ऐसें, मूख असें ती प्रकाशमय शक्ती ।
भ्रामरिकी नांवाची, दिसली त्या मूर्च्छनें गलित शक्ती ॥२३॥
सावध झाला भूपति, आश्रय आधार शक्तिचा ज्यास ।
ऐशा गणेशलोका, दाखविती दूत काशिराजास ॥२४॥
(शार्दूलविक्रीडित)
कोटी-सूर्य-वरी प्रकाशमय तीं सारींच तीं मंदिरें ।
सोन्याचीं रजतीं तशींच मणिकीं रत्नेंचि मोत्यें सरें ।
कांतीचीं रचिलीं सुरेख दिसलीं अग्नीपरी तेजस ।
तेथींचे नर ते सुरुप सुखिशा नारी बघे राजस ॥२५॥
चंद्राचा अरसा करुन बघती सारीं मुखें सोज्ज्वल ।
वायूही श्रम हारण्यास करितो मोदें विहारी स्थल ।
ऐशा इक्षु-समुद्र-तीर निवसें मोदें गणाधीश हा ।
आले दूत तिथें नृपास म्हणती पाहें प्रभूलोक हा ॥२६॥
(गीति)
काशीराजा गेला, दर्शन झालें गजानानप्रभुचें ।
मोरेश्वरसुत कवनीं, पूजन करि त्या सुबुद्धिदात्याचें ॥२७॥