(गीति)
देवांतकास वधुनी, दुसरे दिवशीं सभेंत स्वस्थानीं ।
काशीराजा बैसे, पुरवासीजन प्रधान यां बघुनी ॥१॥
बोले नृपती त्यांना, मम पुत्राचा विवाह करण्यास ।
अणिलें विनायकाला, होती उत्पात बहुत नगरास ॥२॥
निरसुन विनायकानें, संकट मुळ तें समूळ छेदियलें ।
आतां शांत समय हा, कार्य करुं कीं त्वरीत योजियलें ॥३॥
बोले प्रधान भूपा, अपुला हेतू सुयोग्य कीं आहे ।
आयती करणें आतां, देईं मत तेधवां नृपाळा हे ॥४॥
अनुमोदिलें जनांनीं, कार्याची सर्व सिद्धता केली ।
भूपति सुमुहूर्त पाहे, कार्यासी सर्व मंडळी आली ॥५॥
सुर मुनि भूपति सारे, जमले कार्यास तेधवां मोदें ।
अनुपम ऐशा थाटें, कार्य घडे कीं अविघ्नपणिं मोदें ॥६॥
एणेंपरि कार्यासी, सारुन झाला नृपाल बहु शांत ।
देउन विनायकाला, वस्त्राभरणादि भोजनासहित ॥७॥
तोषवुनि त्या भूपति, सुंदर रथ आणिला प्रभूसाठीं ।
कश्यपनंदन जातो, अपुल्या सदनीं म्हणून या भेटीं ॥८॥
कळतां मात जनांसी, आले नृपमंदिरांत ते सकळ ।
शोकाकुलीत झाले, स्तविती बहु भक्तिनें तया सकळ ॥९॥
प्रभुंनीं जनांस दिधला, धीर बहू शांतवीत त्यांलागीं ।
भूपति बरोबरी त्या, पोंचविण्या जातसे गृहालागीं ॥१०॥