(शार्दूलविक्रीडित)
घेई बाण करीं असूर मग तो योजीत अस्त्रास त्या ।
टाकी मोहुनि सैन्य जी मुनिसुता सिद्धीस अस्त्रेंच त्या ।
येई त्यांस बहूत त्या स्थळींच कीं निद्रा जणूं योग्यशी ।
देखोनी मग ती अनंदित अशी मुद्रा मुरा होतशी ॥१॥
कृत्या साध्य करीत तो असुर कीं होमादि कर्मां करी ।
भूमी शुद्ध करी पुढें असुर तो तीकोन कुंडा करी ।
अग्नीसी अभिचार कर्म करण्या प्रारंभ मित्रा करी ।
अग्नीच्या पुढतीहि नग्न बसुनी मंत्रोन होमा करी ॥२॥
मांसाच्या दशशें यथाविधि अशा देवोन पूर्णाहुती ।
एकाग्रें यजनांत लक्ष मुर दे देतो विधी आहुती ।
होतां पूर्ण तदा शिखींतुन निघे कृत्या जणूं काल ती ।
संतोषें पुढती उभी असुर जो देवांतका प्राप्त ती ॥३॥
केलें घोर असें वनीं तप असें देवांतकाच्या तपें ।
बोले ती असुरा पिशीत-पलिं कीं तृप्ती पुरी हो तपें ।
आतां भीति नसे तुला म्हणतसे कृत्या अशी ओरडे ।
केलें पूजन तें असूरपतिनें घाली पुन्हा कापडें ॥४॥
बैसे अंकिं तिच्या असूरपति तों कृत्या उडे तेथुनी ।
आकाशीं मग ती तिला वदतसे संचार मी येथुनी ।
हे कृत्ये तुझि ही कृपा मजवरी बोले मुराधीपती ।
आतां काय करी मला गणपती येथें वदे दुर्मती ॥५॥
(गीति)
होती सेना मोहित, तत्रापी देव रक्षणासाठीं ।
प्रार्थित काशीराजा, हें ऐकुन मोह सोडिला जेठीं ॥६॥
मायेच्या नाशास्तव, दो बाणीं अस्त्र योजिलें प्रभुंनीं ।
एका बाणीं घंटा, दुसर्यावरि कीं विहंग योजूनी ॥७॥
घंटांच्या नादांनीं, उठले सारे त्वरीत ते देव ।
हातीं अयुधें घेउन, सिद्धींसह पातले तिथें देव ॥८॥
दुसर्या बाणीं पक्षी, लक्षावधि जनित ते त्वरें झाले ।
पक्षांच्या वातानें, असुरी मायेस नाशिते झाले ॥९॥
राक्षस सेना गिळिती, असुरानें घेतलें करीं चाप ।
केली विनायकावरि, शरवृष्टी तेधवां अपोआप ॥१०॥