(गीति)
तप पाहुनियां तोषे, प्रसन्न झाला गजाननप्रभु तो ।
दशहस्तयुक्त तेजस, रुप धरुनियां वरार्थ तो जातो ॥१॥
दर्शन दिधलें त्यांना, त्यांनीं स्तविलें अनन्य भावांनीं ।
त्यांना वर मागाया, आज्ञा दिधली गजाननप्रभुंनीं ॥२॥
त्यांनीं स्तविल्या श्लोकां, कुजन्मनाशन प्रसिद्ध तें स्तोत्र ।
नाम तयाला दिधलें, पठतां षण्मासि वैभवा स्तोत्र ॥३॥
देईल वर हा दिधला, कथिला वृत्तान्त कीं प्रभुस त्यांनीं ।
दंपत्याला द्यावेम पूर्वीचे, देह ते कृपा करुनी ॥४॥
त्या समयीं प्रभु वदती, फुकट नसे तें सु-भक्त भाषण हो ।
यास्तव वास करीं मी, मंदरवृक्षातळींच मुनिवर हो ॥५॥
होई मान्य त्रिजगिं, त्या वृक्षाच्या मुळास जो कोणी ।
माझी मूर्ती स्थापुन, अर्पी दूर्वांसहीत शमि प्राणी ॥६॥
त्यांची इच्छा मी कीं, पूर्ण करिन हें खरोखरी मुनि हो ।
मंदर-शमि-दूर्वा हीं, एके ठायीं सुयोग दुर्लभ हो ॥७॥
भक्त-भ्रुशुंडि भाषण, सत्य करावें म्हणून वर देई ।
मंदर शमितळिं बैसे, यास्तव शमि ती प्रभूस प्रिय होई ॥८॥