(गीति)
पूर्वीं सत्रमाजी, पुराण कथिते प्रमूख जे सूत ।
शौनक मुख्य मुनी हे, वदती त्यांना पुढें कथा वृत्त ॥१॥
अपुल्या मुखीं कथा त्या, बहुविध ऐकून मुदित हो आम्ही ।
झालों बहूत आतां, अणखी कथणें श्रवूं कथा आम्ही ॥२॥
सूत म्हणे त्या मुनिसी, कथिला तुम्हां उपासनाखंड ।
क्रीडाखंड अतां मी, कथितों तुम्हां बहूत तो चंड ॥३॥
क्रीडाखंडामध्यें, मर्दुनि पुष्कळ असूर या जगतीं ।
गोविप्रसाधुसंतां, गणपति रक्षी तयांस बहु प्रीती ॥४॥
विधिनें व्यासां कथिल्या, भृगु कथिती सोमकांत भूपा त्या ।
सांगे तुम्हांस आतां, ऐकाव्या सावधान चित्तीं त्या ॥५॥
विष्णुमुखीं मीं श्रुत जें, केलें अख्यान सांगतों कीं तें ।
ऐका समस्त आतां, श्रवणें मननें करुन कीं मग तें ॥६॥
गणपति युगीं युगीं कीं, प्रसिद्ध होती अनेक नामांनीं ।
वहनें तशींच योजुन, दैत्याम वधती बसून त्या वहनीं ॥७॥
कृतयुगिं वदती प्रभुसी, नाम ’विनायक’ असेंच हें साचें ।
सिंहावरि बैसुनियां, मर्दन करिती प्रचंड असुरांचें ॥८॥
त्रेतायुगीं मयुरावर, ’मयुरेश्वर’ नाम घे बसुन पृष्ठीं ।
असुर वधुनियां सारे, रक्षियली कीं समस्त ही सृष्टी ॥९॥
द्वापारीं नाम पहा, प्रसिद्ध झालें ’गजानन’ प्रभुसी ।
रक्षति समस्त जीवां, ब्रीद असें हें धरुन समयासी ॥१०॥
कलियुगिं प्रसिद्ध होइल, नाम तया ’धूम्रवर्ण’ हें खास ।
मूषक वहनी बैसुन, म्लेच्छां वधि भूवरी करुन वास ॥११॥
(दिंडी)
भरतखंडीं हा अंग देश भाग ।
तिथें नांदतसे विप्र एक चांग ।
रौद्रकेतू हें नाम तया होतें ।
वेदशास्त्रादी योग्य पठण होतें ॥१२॥
सदाचारी हा योग्य असा होता ।
असे साध्वी त्या रुपवती कांता ।
रुप सुंदर हें अप्सरा दिसे ऊन ।
अष्टसिद्धी त्या दिसति तशा ऊन ॥१३॥
नाम कांतेचें शारदाच साचें ।
होति गर्भिणि ती तेज अमुप तीचें ।
पुरवि दोहद हे विप्र तिचे सारे ।
प्रसुत झाली ती दोन सूत तारे ॥१४॥
युग्म सुंदर तें रुप मनोहारी ।
नेत्र मोठे ते पाणिदार भारी ।
हस्त लांबट आजानु असे होते ।
सुता पाहुनियां आनंदयुक्त होते ॥१५॥
आणवि ज्योतिष हे जातकर्म-कार्या ।
नाम ठेवितसे रौद्रकेतु भार्या ।
नाम देवांतक ज्येष्ठ सुता ठेवी ।
नरांतक हें नाम दुजा ठेवी ॥१६॥
(साकी)
एके दिवशीं नारद आले रौद्रकेतुसदनासी ।
त्वत्पुत्रांची कीर्ती ऐकुन आलों मी बघण्यासी ॥१७॥
धृ० ॥ सुन सुन वृत्तासी मुनि वदती भूपासी ।
लहानपणिं जर इतुकी कीर्ती अवनीवर ती झाली ।
थोरपणिं ही त्रिभुवनिं पसरुन शेष तरी उरली ॥१८॥
अनुपम ऐसी होइल कीर्ती मजला ही वाटे ।
नारद भाषण ऐकुन तेव्हां मोद तयासी दाटे ॥१९॥
रौद्रकेतु कीं बोले मुनिं हो अपुल्या आशीर्वचनें ।
दीर्घायू हे होवो आणी जिंको अरि स्वबलानें ॥२०॥
ऐसा कांहीं उपाय सांगा रौद्रकेतु हें वदला ।
दंपत्याचें प्रेम सुतावरि देखुनि हें मुनि वदला ॥२१॥
नारद मुनिंनीं उभय सुतांसी घेउनियां शेजारीं ।
बोधियला मग पंचाक्षरि हा मंत्र जपा अविकारी ॥२२॥
त्या सूतांना आज्ञा केली भजणें कीं त्रिपुरारी ।
ऐसें नारद सांगुन गेले सूत म्हणे अवधारीं ॥२३॥