(दिंडी)
विधी व्यासांना स्वकिय वृत्त सांगे ।
प्रभू आराधन करित योग्य आंगें ।
सह्य पर्वतिं कीं क्षेत्र एक आहे ।
महाबल हें नाम तया आहे ॥१॥
तिथें नांदत तो गिरिश-देव व्यासां ।
मला वाटे कीं यज्ञ करुं खासा ।
म्हणुन गेलों मी गिरिशगृहीं यागा ।
सवें भार्याही घेतल्या असें यागा ॥२॥
तिथें जाउनियां गिरिश यांस सांगे ।
त्वदिय सदनीं कीं याग करुं वागे ।
असें माझें हें मनिष करा पूर्ण ।
साहाय्य अपुलें तें याचितसें पूर्ण ॥३॥
असें प्रार्थुनियां याग-गृहा स्थापी ।
उभवि मडप नी यागकुंड मापीं ।
करी यागाची सिद्धता स्वयें सर्व ।
बसे यागासी योग्य बघे पर्व ॥४॥
सती सावित्री करित गृहीं काज ।
नसे आव्हानीं म्हणुन सख्या तीस ।
दुजी गायत्री घेतली असे यागीं ।
याग आरंभी योग्य अशा योगीं ॥५॥
तोंच सावित्री मंडपामधें आली ।
मदियवांचुन हो सुरुवात कशी केली ।
वदत रागानें ऋत्विजां सती काय ।
मदिय केला अपमान असा काय ॥६॥
म्हनुन सिद्धिस हा याग नसे जाई ।
त्वरित सकलांची जडहि तनू होई ।
शाप ऐकुनियां भयभीत असे झाले ।
वदति तिजला कीं जलहि असें बोले ॥७॥
अशी ऐकुनियां विनित सती-वाणी ।
मान्य केली ते होत सर्व पाणी ।
नदीरुपी ते सकल देव झाले ।
तोंच कांतांनीं नवल देखियेलें ॥८॥
(शार्दूंलविक्रीडित)
इंद्राणी कमळा उमा इतर त्या छाया अशा कामिनी ।
मान्याचा अपमान हा करुनियां यज्ञास ही भामिनी ।
आव्हानीं नच हे विधी करिसी कां यागास आरंभिसी ।
वाटे कीं प्रभुला गजानन अधीं तूं तो नसे पूजिसी ॥९॥
यासाठीं पति आमुचे जल असे झाले विधी खास हें ।
रक्षी त्या सकलां वदे विधि तयां भीऊं नका साच हें ।
सर्वांचें हित तें करीन वदलों यत्नास मी लागतों ।
आतां सर्वजणी गजानन भजा मीही तपा बैसतों ॥१०॥
(गीति)
एणेंपरि सुरकांता, शांत करुनियां बरोबरी घे मी ।
कर्नाटक प्रांतीं त्या, नेल्या सत्वर स्थलास त्या नामी ॥११॥
श्रीरामचंद्र जेथें, रावणहननीं यशस्वि होण्यासी ।
मंदर वृक्ष तळीं तो, तपसा करि वक्रतुंड सायासी ॥१२॥
तेथें सुरकांतांनीं, शमिपत्रीं वक्रतुंड पूजियला ।
प्रसन्न होऊन त्यांना, प्रकटे प्रभुवरद रुप तो झाला ॥१३॥
पाणी चार जयाला, कर्णी कुंडल किरीट तो शिरसा ।
ऐसें रुप बघूनी, स्तविल्या झाल्या प्रचूरशा वचसा ॥१४॥