मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|
अध्याय २२

क्रीडा खंड - अध्याय २२

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

बहुविध विनायकाच्या, पाहुन लीला पराक्रमामाजी ।

आश्चर्यचकित झाले, जन सारे भूपतीहि त्यांमाजी ॥१॥

आहे ईश विनायक, किंवा मानव कळेल कोणाला ।

जरि त्यासि ईश म्हणूं, खेळे तोकां सहीत कीं बिदिला ॥२॥

मानव म्हणतां त्याला, लीला त्याच्या अगाध त्या थोर ।

येती न त्या मनुष्या, करितो सहजीं विनायक प्रचुर ॥३॥

एतद्विषयीं कांहीं, तर्क न चाले कुणासही त्याचा ।

अवतारी बालक हा, वाटे सर्वांसही प्रभू साचा ॥४॥

(साकी)

एके दिवशीं प्रातःकाळीं राजसभेमाजी ।

नागरीक ते लोक पातले सत्कारी नृप प्रभुजी ॥५॥

धृ० ॥सुन सुन करी वृत्ता । पावन करि त्वच्चित्ता ।

आगमनाचें कारण पुशिलें रायें त्या लोकांस ।

कथिलें त्यांनी इच्छित अमुची पुरवा ही आस ॥६॥

विनायकाला अमुच्या सदनीं भोजनास न्यावें ।

इच्छित मानस पौरजनांनीं कथिलें भूपा भावें ॥७॥

मानस जाणुन बोले लोकां विप्र विनायक खासा ।

यावें भोजन करण्यासाठीं धरिला कां मनसा ॥८॥

मजला भोजन घालुन तुम्हां लाभ काय हें बोला ।

आहे लघु मी कुमार मुनिचा लोक बोलती मजला ॥९॥

केवळ लग्नासाठीं तुजला भूपानें अणियेलें ।

तदनंतर तूं जाशी म्हणुनी आम्हीं हें ठरवीलें ॥१०॥

परतुन जातां येशी कैसा यास्तव सदनीं यावें ।

आहे सवडी आतां तुजला आमंत्रित कीं भावें ॥११॥

आलों आम्हीं योजुन सारें विनायका तुजपाशीं ।

बोले बालक त्या सर्वांना पुसणें कीं रायाशीं ॥१२॥

ऐकुन भाषण विनायकाचें, आनंदित जन सारे ।

आमंत्रण हें दिधलें त्याला गेलें सदनीं सारें ॥१३॥

(उपेंद्रवज्रा)

विनायकाच्या चरणें करुन । पुनीत व्हावें गृह हें म्हणून ।

त्वरीत सारें करिती तयारी । सुपूर्ण शोभा पुरीं गेहिं सारी ॥१४॥

पुरांत राहे द्विज एक शुक्ल । तपेंच भासे शशिपूर्ण शुक्ल ।

तशीच त्याच्या मनिं पूर्ण शांती । तशीच त्याची बहु प्रीति दांतीं ॥१५॥

द्विजास साजे श्रुतियुक्त कर्म । तसाच यागादिहि युक्त कर्म ।

निपूण नी निःस्पृह विप्र होता । तयास साध्वी पतियोग्य कांता ॥१६॥

(कामदा)

विद्रुभा असे नाम तीजला । सुस्वभावि तो विप्र कीं भला ।

विपत्ती तया बहू ती असे । कामिनी सती शांत ती असे ॥१७॥

 

(शार्दूलविक्रीडित)

कांतेला परिधान वस्त्रहि नसे नेसेच ती वल्कलें ।

नाहीं भूषणही परंतु दिसतें तेजें पतीच्या बलें ।

कांतेच्या विनया बघून पतिचें मोदें दिसे मूख तें ।

ऐसें मानस हें सतीस दिसतां प्रेमायुता वाटतें ॥१८॥

भिक्षेसाठिंच तो पुरांत फिरतां उत्साह पाहे पुरीं ।

भिक्षा त्या न मिळे म्हणून परते येई घराभीतरीं ।

आहे उत्सव कीं पुरांत म्हणुनी भिक्षा पुरी ना मिळे ।

द्यावें भोजन त्या प्रभूस मजला वाटे असें निर्मळे ॥१९॥

(गीति)

आज कदाचित येई, सदनासी तो प्रभू स्वयें खास ।

भोजन करण्यासाठीं, आयति करणें वदेच तो तीस ॥२०॥

बोले पतीस कांता, नगरींच्या धनिकशा गृहीं थाट ।

पाहुन जाई तेथें, अपुल्या गृहिंची दिसे न ती वाट ॥२१॥

अपुल्या सदनीं प्रभुला, न मिळे कांहीं असे सती वदली ।

शुक्ल तियेसी बोले, ऐसें बोलूं नको कदा कालीं ॥२२॥

परमात्मा भक्तीचा, आहे क्षुधित प्रिये वदे विप्र ।

भक्तीनें वश होतो, आयति करणें सती अतां क्षिप्र ॥२३॥

भक्तीनें देतां त्या, तुष्टे पाहून भक्तिला भारी ।

दंभें देतां त्याला, रुष्टे प्रभु तो तयावरी भारी ॥२४॥

ऐकुन पतिवचनाला, आयति आहे गृहांत पतिराज ।

अष्टादश धान्याची, रोटी केली सु-तंडुली पेज ॥२५॥

होते नव्हतें खर्चुन, उधार आणिलें सुतैल नी तूप ।

कंदमुळादि वल्कल, दीपादी आरतीस तो धूप ॥२६॥

साहित्यपूजनाचें, मुखशुद्धीला सुका असे अवळा ।

दर्भाचें आसन तें, मांडुनि वाटेस पाहते अबळा ॥२७॥

नैवेद्य वैश्वदेवहि, सारुन वाटेस पाहतो विप्र ।

ध्यानस्थ बैसला तो, सदनीं येई प्रभू तरी क्षिप्र ॥२८॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP