(वसंततिलका)
व्यासास वामन कथा विधि सांगतात ।
पूर्वी जनीत वसुधा करण्यास देत ॥
आज्ञा मदीय सुत जो मुनि कश्यपास ।
तेव्हां गजानन वरें बल येइ त्यास ॥१॥
चौदा स्त्रिया जनित त्या करिती धरा ही ।
होत्या स्त्रिया प्रमुख या अदिती दिती ही ॥
एके दिनीं दिति वदे मुनिलागिं हेतू ।
भोगा मशीं मुनिवरा पुरवाच हेतू ॥२॥
तेव्हां वदे मुनि तिला तिनिसांज झाली ।
अग्नीस होम यजनां मशिं वेळ झाली ॥
आतां तुला रतिस कीं दिधल्यास योग्य ।
सूतास तूं प्रसवसी दिति हें अयोग्य ॥३॥
बोले पतीस दिति ती मज कामतापें ।
पोळे तनू खचित कीं मम कामतापें ॥
झालीच विव्हळ अशी दिति ती श्रवीना ।
जाणून हें मुनि तिला रति देत मौनां ॥४॥
झाले तिला द्वय सख्या एक दक्ष ।
एकास नाम दिधलेंच हिरण्य-आक्ष ॥
नामें हिरण्य-कशिपू दुसरा असे तो ॥
एतद्विषीं श्रविच भाग पुढें असे तो ॥५॥
घेती तपास शिवमंत्र पित्याकडून ।
जाती तपास द्वय ते विपिनीं म्हणून ॥
केलें तपास अति दारुण त्या द्वयांनीं ।
पावे तयांस शिव कीं तप साधनांनीं ॥६॥
देती तयांस वर हे शिव मागती ते ।
रात्रीं दिनीं मरण कीं ख च भू न येतें ॥
कोणांकडून मरणें न घडोच देवा ।
द्यावा अम्हांस वर हा प्रभु सांबदेवा ॥७॥
झाले प्रसन्न शिव ते वर देत त्यांस ।
जाती अधीं करित ते सुरलोकवास ॥
इंद्रास घालवित ते तइं राज्य घेती ।
व्यासां तिथें प्रबळ ते दितिसूत होती ॥८॥
(भुजंगप्रयात)
धरी रुप विष्णू किरी हा त्वरेनें ।
हिरण्याक्ष तेथें वधिला रदानें ॥
अतां राहिला एक तो दैत्य मित्रा ।
कथा ऐकती हो असे ती विचित्रा ॥९॥
तयाला असे कीं सुत विष्णुभक्त ।
तया नांव ठेवीच प्रल्हाद युक्त ॥
करी सूत मोठी हरीचीच भक्ती ।
पित्यासी रुचेना रिपूचीच भक्ती ॥१०॥
सुताचा करावा त्वरें नाश तात ।
करी यत्न ते कीं बहूसाळ सूत ॥
मरेना तरी कीं हरि रक्षि त्याला ।
प्रभूरुपि तो नारसिंहाख्य झाला ॥११॥
(गीति)
आंत नको बाहेरी, यास्तव दारामधेंच तो चतुर ॥
दिवसा रात्रिं नसावा, यास्तव गोरज धरीच वेळ तर ॥१२॥
खालीं-वरी न येवो, यास्तव अंकावरीच घेत असे ॥
सजिव न अजिव न येवो, यास्तव नखिंचा प्रयोग योजितसे ॥१३॥
शस्त्रीं अस्त्रिं न येवो, यास्तव नखिंनीं विदारिला पोटीं ॥
वधिला रिपु भक्ताचा, हरि सजला भक्तरक्षणासाठीं ॥१४॥
त्या भक्तासी झाला, सूत विरोचन प्रसिद्ध नांवाचा ॥
त्याचा पुत्र असे कीं, बलि नांवानें प्रथीत तो साचा ॥१५॥
(उपेंद्रवज्रा)
विरोचनानें रवि आळवीला ।
प्रसन्न तेव्हां रवि त्यास झाला ॥
किरीट देई रवि त्यास एक ।
शिरीं असे तों नच मृत्यु ऐक ॥१६॥
अशा वरानं जगतास जिंकी ।
म्हणून सारे सुर चिंतिती कीं ॥
हरीस सारें कळलेंच व्यासा ।
नटेच तेव्हां हरि नारि खासा ॥१७॥
विरोचनाच्या जवळीच गेली ।
त्वरीत त्याची मति मोहविली ॥
विरोचनाला उपदेश केला ।
शिरास लावीन सुंगधतैला ॥१८॥
शिरास चोळी स्वबळें करुन ।
निघून गेला जिव त्यामधून ॥
विरोचनाचा करि अंत नारी ।
हरी सुरांचा बघ साहकारी ॥१९॥
करुन व्यासा हरी इष्ट कार्या ॥
कथा अशा त्या भृगु भूपतीला ।
कथीत ऐके नृप त्या स्थळाला ॥२०॥