(शार्दूलविक्रीडित)
बुद्धीला दिधली त्वरीत प्रभुंनीं आज्ञा तदर्थी तदा ।
केली कीं प्रणती निघे समरिं ती गर्जे मुदें एकदां ।
शक्ती एक निघे प्रचंड वदनीं ब्राह्मप्रदेशीं पडे ।
तेव्हां ती शिरली दलांत बघुनी सेना रणीं ती पडे ॥१॥
पाहे दैत्यपती करीत शरिं कीं वृष्टि बहू ती गिळे ।
शक्ती ती शिरतां गिळीत मुर ते दैत्यप्रभू तो पळे ।
श्रांते तों धरिला शिखेस वहिला आणीतसे तेधवां ।
देवांसंनिध तो वदे प्रभुस ती स्वाधीन घ्या हो धवा ॥२॥
श्रांते मी समरीं सुशांत मजसी स्थानास द्यावें अतां ।
बोले तो प्रभु कीं शिरे उदरिं तूं बुद्धी शिरे शांतता ।
पावे तों इकडे मुर-प्रभु पळे ऐका मुनी ही कथा ।
सांगे तो भृगुही नृपास सदनीं ऐके सतीही कथा ॥३॥