(गीति)
चुकवुन विनायकाला, देवांतक स्वगृहीं निघुन गेला ।
जननीजनकापुढती, लज्जेनें स्तब्धसा उभा ठेला ॥१॥
त्याच्या स्थितीस पाहुन, जनकानें त्यास दीधला धीर ।
सांगें वृत्त मला तूं, लज्जा सोडून सांगणें सुधिर ॥२॥
सांगे कल्लयाणाचा, मार्ग तुला मी सुरांतका साच ।
हें जनकभाष्य ऐकुन, लज्जा सोडून वृत्त कथि साच ॥३॥
ऐकुन वृत्त सुताचें, शंभूचा मंत्र सांगतो जनक ।
पुत्रास देत आज्ञा, मंत्र जपे भावपूर्ण हो भजक ॥४॥
शंभू प्रसन्न होती, वरदानें होमकुंड त्यामाजी ।
उत्तम वाजी जन्मे, त्यावरि बैसोन जा करी आजी ॥५॥
म्हणजे तुजला जय तो, लाभे सत्वर खरोखरी सूता ।
नंतर सुस्थल पाहुन, दोघे गेले तपास सुतजनिता ॥६॥
असनें घालुन बसले, यजना करिती यथाविधी दोघे ।
यजनसमाप्ती होतां, अग्नीपूजन करीत ते दोघे ॥७॥
इच्छित देवा बलि दे, देवांतक तात तो सुरांतका तेथें ।
शंभू प्रसन्न झाला, देवांतक हा सजीव होत तिथें ॥८॥
नंतर दुसरे दिवशीं, सूर्योदयिं होमकुंड त्यामाजी ।
झाला जनीत बघतां, काळा उत्तम चलाख कीं वाजी ॥९॥
बैसुन वाजीवर त्या, त्वरित निघे समरभूमिसी सखया ।
उरली सेना होती, आज्ञा दिधली चला म्हणे राया ॥१०॥
पुनरपि युद्धारंभीं, वदतो तो शूरसैनिकां काय ।
मजला दिधली पीडा, टोंचून बोले पुनः पुनः धाय ॥११॥
युद्धारंभ करी मग, हिंसे वाजी दलामधें जेव्हां ।
कांहीं सैनिक मुकले, रव ऐकुनि समरभूमिसी तेव्हां ॥१२॥
कांहीं टापांखालीं, चिरडुन मेले तसेच वधि कांहीं ।
यास्तव बाकी गेले, देव गजानन स्थलास हे कांहीं ॥१३॥