मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|
अध्याय ७३

क्रीडा खंड - अध्याय ७३

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

पूर्वी मिथिला देशीं, नगरीचें नाम गंडकी प्रथित ।

हरिपरि पराक्रमी नी, कर्मानें पुण्यवान नृप प्रथित ॥१॥

त्या रायाचें होतें, विष्णुपरि चक्रपाणि नाम असें ।

त्याची पत्‍नी उग्रा, मोठी साध्वी यथार्थ नाम असें ॥२॥

पातिव्रत्य तियेचें, पाहुन सति कीं तिच्याकडे येती ।

पातिव्रत्य शिकाया, नियमितपणिं त्या बहूतशा येती ॥३॥

(शार्दूलविक्रीडित)

विष्णू-भक्त तसा पुरा निपुण तो चर्मादि शास्त्रांमधें ।

त्यातें संतति ती नसे म्हणुन तो पुत्रार्थ यत्‍नांमधें ।

होता भूपति तो परंतु सगळे झाले फुका यत्‍न ते ।

कंटाळे मग तो प्रधान-जनही पाचारितो भूप ते ॥४॥

मातें संतति कीं नसे म्हणुन मी जातों वनीं येधवां ।

जन्माच्या मम सार्थकास करितों प्रार्थुन मी माधवा ।

बोले भूपति तों प्रसिद्ध मुनि तो नामें असे शौनक ।

तेथें येत असे बघून पुढती जाई जसा सेवक ॥५॥

होता तो बहु जाणता सकलही ज्योतिषशास्त्रीं पुरा ।

पुजी भूपति त्या यथाविधि अधीं बोले मुनी भूवरा ।

सत्कारें मम मोद होत परि कीं नाहीं तुला संतती ।

हें मोठें तव दुःख वाटत असे भूपा न हो संतती ॥६॥

(गीति)

संतति नसे तुला कीं, जानें मी भूपती धरीं धीर ।

माझ्या आशीर्वादें, तुजला सुत प्राप्त हो जसा हीर ॥७॥

(भुजंगप्रयात)

सती चक्रपाणी नमी ती ऋषीला ।

अहो संतती प्राप्त हो यत्‍न बोला ।

मुनी त्यांस सांगे भजा सूर्यदेवा ।

तुम्हां सूत होई अशिर्वाद घ्यावा ॥८॥

अहो माघ-मासीं तिथी शुद्ध सात ।

करीं पूजनासी यथासांग त्यांत ।

करा चंद्रमासीं विधीयुक्त पूजा ।

व्रतारंभ सांगे करी श्रूत राजा ॥९॥

(शार्दूलविक्रीडित)

आरंभीं करणें प्रभातसमयी स्नानादि नेमा विधी ।

पूजावा मग तो गजानन पुढें कार्याअधींचा विधी ।

आशीर्वाद तदा शुभार्थ मिळतां विप्रा-मुखींचे भलें ।

त्याचें नंतर त्या व्रतास विधिनें तें आचरावें भलें ॥१०॥

हेमाच्या कलशावरी प्रथम कीं स्थापी रवी मंडल ।

पूजावें विधिनी सुगंध सुमनीं रक्त प्रयुक्तीं-दल ।

द्यावे द्वादश अर्ध्य कीं नमनिंची संख्या मिती तीतुकी ।

घालाव्या मग त्या प्रदक्षिण मिती भूपा वदे तीतुकी ॥११॥

प्रार्थी त्या रविसी व्रतास करिसी सूतास तूं लाभसी ।

त्यांनीं तें व्रत सांगतां त्वरित कीं केलें असे भक्तिसी ।

जाणूनी रविनें स्वरुप पतिचें घेऊन स्वप्नीं सती ।

भोगूनी रवि गर्भ देउन तिसी जाणे न हें भूपती ॥१२॥

(गीति)

दुसरे दिवशीं भेटी, राणी मग ती स्वनाथ जो त्यासी ।

भंगे व्रतस्थपणिं कीं, व्रत करणें सांग हें पुसे पतिसी ॥१३॥

अपणां प्रसन्न रवि तो, सूता प्रसवे वदे तिला नृपती ।

ऐके व्यासा विधि हें, कथना करी तें भृगू श्रवे नृपती ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP