(पृथ्वी)
समस्त सुर हे बहू करित कीं विचारास ते ।
समस्त करुं ईश्वरा बहुत प्रार्थुनी प्राप्त ते ।
त्वरीत वर देउनी करिल तो पुरी वासना ।
समस्त सुर-बंधनीं असुनही निघे कल्पना ॥१॥
परंतु कवणा म्हणूं अपण सर्वही ईश्वर ।
विचार करि पूर्ण तो वदत ते सुरां ईश्वर ।
असे अदिति-सूत तो सकल वागवी सृष्टि ही ।
तया शरण जाउनी यजन तें करुं सर्वही ॥२॥
तयास वशही करुं विजयि सर्वही होउंया ।
बसे हरिवरी धरी दश-करीं सुशस्त्रांस या ।
अणूं पुनित मृत्तिका करुन मूर्ति ही स्थापुनी ।
सुभव्य करुं मंडपीं यजन कीं करुं भक्तिंनीं ॥३॥
विचार रुचला सुरां करिति पूजना तेधवां ।
प्रसन्न प्रभु जाहला दिसतसे तया माधवा ।
सुतेज प्रसवे तिथें नयन सर्वही झांकिती ।
निघे त्वरित त्यांतुनी प्रभुच तो असें पाहती ॥४॥
(वसंततिलका)
बोले विनायक तयां बहु दुःख सिंधू ।
देई तुम्हांस समजे मज मित्र-बंधू ।
दैत्यांस नाशुनि करी मग धर्मसेवा ।
जन्मे प्रथीत गिरिजासुत साक्ष देवा ॥५॥
(गीति)
कृतयुगिं जन्मुन झालों, नाम विनायक प्रसिद्ध अवतार ।
त्रेतायुगांत घेई, नाम मयूरेश्वराख्य अवतार ॥६॥
द्वापारीं मज म्हणती, नाम गजानन सु-भक्त सद्भावें ।
कलियुगिं म्हणती मजला, ऐकावें धूम्रवर्ण या नांवें ॥७॥