(गीति)
हरिवर बैसुन प्रभु तो, देवांतक याचि पाहतो वाट ।
दोघे परस्परांशीं, पाहति तेजाळ रुप नी थाट ॥१॥
भीषण रव केला नी, क्रोधानें विकट हास्य करि देव ।
बोले सुरांतकाला, मद्यानें माजलास ही हाव ॥२॥
किंवा सन्नीपातें, नष्ट तुझी बुद्धि जाहली काय ।
तुजला वधावयासी, धरिलें हें रुप जाणशी काय ॥३॥
ऐसें विनायकानें, बोलुन धनु सज्ज हें करी खास ।
सोडी बाण तयावरि, तोडी राक्षस पडेच अवनीस ॥४॥
नंतर असूर चापा, जोडुन बाणा प्रभुवरी सोडी ।
हुंकारें कीं प्रभु तो, बाणांचा नाश करुन तो मोडी ॥५॥
नंतर विनायकानें, एका बाणें करुन किरिटासी ।
पीडियलें दुसर्यानें, कुंडल दोनी तशींच अवनीसी ॥६॥
दो बाणांनीं खांदे, भेदियले नी त्वरीत शर एक ।
गेला उडून शिरसीं, खोंचे जणुं रोविला हुडा एक ॥७॥