(गीति)
विरजा मरुन गेली, गेली ही मात राक्षसां कानीं ।
उद्धत आणि घुंगुर, नटले मग ते क्षणींच शुक दोनी ॥१॥
ते शुक कश्यपसदनीं, आले पाहे महोत्कट प्रेमें ।
स्तनपान करित असतां, मागे अदितीस तो करी प्रेमें ॥२॥
(द्रुतविलंबित)
अदिति ती वदली लघु बालका ।
नमिंच ते उडती शुकबालका ।
मजसि ते धरितां नच लाभती ।
श्रवण हें करितो शिशु मात ती ॥३॥
झडपुनी धरि तें शुक वलिक ।
खग मुखीं व्रण ते करिती शुक ।
झडकरी शिशु ते शुक आपटी ।
असुर हो स्वरुपीं शुक शेवटीं ॥४॥
त्यजित जीव असे द्वय राक्षस ।
जननि तें अवलोकित पाडस ।
सु-भट देखुन तें कटिं घेतलें ।
कथन तें पतिसी करि देखिलें ॥५॥
(इंद्रवज्रा)
ऐकुन वार्ता सतिच्या मुखींची ।
साश्चर्ययुक्ता मति कश्यपाची ।
बोले तदा कश्यप कामिनीसी ।
इंद्रास सामर्थ्य नसे वधासी ॥६॥
दैत्यांस बाळें वधिलें सुलीलें ।
वर्षें चतुर्था परि काय झालें ।
जाई तडागीं जननी स-सूत ।
स्नानार्थ दोघे निघती त्वरीत ॥७॥
होता दिनीं तो व्यतिपात योग ।
तैसी तिथी सोमवती सुयोग ।
स्नानास गेली अदिती मुनी हो ।
तीरास ठेवी स्वसुता सती हो ॥८॥
(गीति)
अदिती जलांत उतरे, गेला मागून तो जलीं सूत ।
डुंबे जलांत तेव्हां, मगरी धरि पाय ओरडे सूत ॥९॥
माते धांव असें तो, ओरडला म्हणुन धांवली माता ।
तैसेच कश्यपाचे, धांवति शिष्यहि बघून त्या सूता ॥१०॥
त्यांचा उपाय न चले, लीलेनें मगर फेकि तो कांठीं ।
प्राण तयाचा गेला, निपजे गंधर्व त्या क्षणीं कांठीं ॥११॥
बोले गजाननाला, पूर्वी होतों नृपाळ गंधर्व ।
नामाभिमान होतें, पूर्वीचें चित्ररथचि गंधर्व ॥१२॥
माझे विवाहवेळीं, देवांचें नी समस्त त्या मुनिंचें ।
स्वागत केलें साचें, केलें नाहीं चुकून भृगु मुनिचें ॥१३॥
यास्तव भृगूस आला, माझा बहु कोप तेधवां देवा ।
होशी नक्र म्हणूनी, शाप मला दीधला असे देवा ॥१४॥
प्रार्थुन तयांस याची, द्यावा उश्शाप मागतों चरणीं ।
तेव्हां भृगू म्हणाले, कश्यपसुत स्पर्शतां तुला चरणीं ॥१५॥
मग शापमुक्त होशिल, वदले मजला भृगू ऋषी साच ।
माझा शाप अतां हा, गेला नाशास बोलिला हेंच ॥१६॥
पुत्राचें बल पाहुन, अदिती झाली मुदीत ती फार ।
ऐका कथा मुनी हो, बोले सुत सावधान तो चतुर ॥१७॥