(गीति)
फिरतां फिरतां नारद, इंद्राला भेटण्यास ते गेले ।
भाषण करितां करितां, विधिसूतें वृत्त त्यास कळवीलें ॥१॥
वीतीहोत्री नगरीं, औरव नामक सतेज वेदरत ।
होता विप्र तयाला, पत्नि सुमेधा चतूर ती सुरत ॥२॥
शमिका नामें कन्या, एकुलती एक लाडकी फार ।
आवडीपरी तियेचें, कौतुक करिती बहूत खेळकर ॥३॥
लग्नास योग्य होतां, धौम्य ऋषींचा कुमार मांदार ।
शौनक गुरु तयाचा, होता गुरुसेवनांत रत चतुर ॥४॥
त्याला कन्या अर्पी, विवाहविधि आश्रमीं करितात ।
आनंदयुक्त दोघे, जामातासह वधूस पोंचवित ॥५॥
कांहीं दिवसांनंतर भ्रुशुंडि नामक ऋषी गृहीं आले ।
होते गजाननाचे, निःसिम भक्त वर्णिले पहिले ॥६॥
त्यांना पाहून शमिका, पतिसह हंसली असें तयां दिसलें ।
क्रोधित होऊन त्यांना, वृक्षजयीं व्हा म्हणून शाप दिले ॥७॥
तेव्हां क्षणांत दोघें, वृक्ष जयीं पावलीं कशीं ऐक ।
शमिका शमी तरु तो, पति तो मांदार जाहला ऐक ॥८॥
पशुपक्षि सेविना त्या, ऐसा झाला प्रकार विपरीत ।
महिना झाला म्हणुनी, शौनक आले तया गृहीं त्वरित ॥९॥
मंदार कुठें आहे, पुसती शौनक पित्यास त्या काळीं ।
सावध झाला औरव, सूत स्नुषा शोधिती तया वेळीं ॥१०॥
दोघें दिसति न कोठें, यास्तव पडली तयांस ती चिंता ।
शंका बहूत येती, अंतरसाक्षी गुरु बघे चित्ता ॥११॥
कळलें भ्रुशुंडिशापें, वृक्ष जयीं पोंचलीं उभयतां तीं ।
शोधून गजाननाचा, षष्ठक्षरमंत्र तेधवां जपती ॥१२॥
द्वादश वर्षे तपसा, करिते झाले यथाविधी दोघे ।
ऐकें संवाद पुढें, इंद्रपुरीं करित ते उभय दोघे ॥१३॥
विधि व्यासांसी सांगति, सुंदर सुंदर कथा रमायास ।
त्याच कथा भृगु सांगे, व्याधीशमनार्थ सोमकांतास ॥१४॥