मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|
अध्याय २१

गणेश पुराण - अध्याय २१

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(शार्दूलविक्रीडित)

पक्षानें दिधलें त्यजून वरुनी अंभोसुरा मेदिनीं ।

झालीं तीं शकलें तया तनुचिंही पैकींच तें जाउनी ।

शीर्षाचें पडलें पुरांत ठरलें अंभोसुराचें असें ।

झालें तें श्रुत कीं नरांतक बघे व्याकूळ झाला असे ॥१॥

वार्ता ही कळली बटीक करवि मातेस त्याच्या अशी ।

माता ती पहुडे सुखें कनकिचे शय्येवरी ती निशीं ।

पुत्राचें शिर पाहुनी पडतसे दुःखार्णवीं जेधवां ।

केला शोक तिनें पिटून हृदया क्रोधें वदे तेधवां ॥२॥

सांगे ती सखिला बुडीव शिरसा तैलामधें जाउनी ।

माझा बाळ असा बघोन त्यजिला त्या कश्यपानंदनीं ।

यासाठीं अणित्यें विनायक शिरा त्या पट्टणीं जाउनी ।

तेव्हां मस्तक हें करुं दहन कीं बोले तदा भामिनी ॥३॥

(गीति)

ऐसें वदून उठली, नटली मायें करुन अदितीच ।

काशीराजपुरासी, आली जणुं वाटलीहि अदितीच ॥४॥

नगरींच्या लोकांना, वाटे रंभा तिलोत्तमा अथवा ।

आली उर्वशि येथें, ऐशी सुंदर दिसे तशी सधवा ॥५॥

राणी जाणे तिजला, अदिती आली विनायकासाठीं ।

सांगे अपुल्या, सखिला अदिती आली त्वरीत जा भेटी ॥६॥

सामोरी जाउनियां, स्वागत केलें बहूत आदरांनीं ।

राजश्रिये तुम्हीं हो, अणिलें पुत्रा बहूत दिन सदनीं ॥७॥

त्याचा वियोग मजला, झाला म्हणुनी बहूत आशेनें ।

भेटीसाठीं आल्यें, ऐकुन अणिला कुमार राणीनें ॥८॥

कळवी मातहि नाथां, अदिती आली गृहास कीं यावें ।

ऐकुन मात सतीची, नृपती आला नमीत सद्‌भावें ॥९॥

अपुलें दर्शन झालें, धन्यचि झालों खचीत माताजी ।

अपुला पुत्र खरोखर, कुशल आहे पराक्रमी आजीं ॥१०॥

उत्तम झालें आतां, जावें कार्या करुन सदनास ।

धांवत आला तेव्हां, सूत विनायक स्मरुन कपटास ॥११॥

माझ्याकरितां माते, खाऊ आणिला असेल दे मजला ।

कौतुक करुनी देई, लाडू विषयुक्त जो असे अणिला ॥१२॥

गट्ट करुनियां अणखी, मागे तो बाल-भावनें अणखी ।

दिधला दुसरा लाडू, गिळिता झाला म्हणेच दे अणखी ॥१३॥

सगळे लाडू झाले, हें पाहुन बोलली तिला राणी ।

पाकगृहीं चलावें, पुत्राला भूक लागली जाणी ॥१४॥

पाकगृहांत नेलें, भोजन दिधलें तिथेंच दोघांस ।

उठतां सुतासहित ती, भारें निजला न ये उठायास ॥१५॥

झोंपीं गेला आंगें, मांडिवरि दे तसाच ताणून ।

तिजला भार न सोसे, देती झाली तयास लोटून ॥१६॥

उतरे अंकिं न खालीं, पाहुन राजा तीयेस तो वदला ।

बालक झोंपीं गेला, झोंप तयाची न मोडणें तिजला ॥१७॥

लघु लघु बाळें ऐशीं, निजती अंकावरीच मातेचे ।

ऐसें बोलत असतां, पर्वतसम वजन वाढलें त्याचें ॥१८॥

चिरडुन प्राणा मुकली, अदितीरुपी असूर ती माता ।

प्रकटे रुप तियेचें, कळलें अंभोसुराख्य ती माता ॥१९॥

(इंद्रवज्रा)

साश्चर्य झाले सगळेच फार ।

राजा करी तो स्तवनास फार ।

केली प्रभूची दश-पद्य सेवा ।

केली नृपानें स्वमुखेंच भावा ॥२०॥

(गीति)

क्रीडाखंडामधले, प्रसंग कथिले सुपद्य एकविस ।

वाहे कवनारुपें, दूर्वा कोमल प्रभूस एकविस ॥२१॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP