(गीति)
सैनिक सांगति वृत्ता, ऐकुन वदला नरांतक क्रोधें ।
म्याडांनो मूर्खांनो, बडबडतां हें कुणापुढें साधें ॥१॥
मी शूर वीर कोठें, यःकश्चित् विप्र कारटा कोठें ।
प्रल्याग्निपुढें जैसा, मशक तसा तो मला असा वाटे ॥२॥
किंवा मूषक खणितां, मेरु पर्वत पडेल कीं काय ? ।
मेरुपुढेंच मूषक, तैसा तो विप्रकारटा होय ॥३॥
यास्तव तुम्हीं आतां, जावें सैन्यास घेउनी अणखी ।
काशीराज नगर तें, लुटुनी आणा समग्र तें अणखी ॥४॥
पुनरपि युद्धा आले, सैनिक त्याचे बघा तुम्हीं सारे ।
ऐशी आज्ञा केली, राक्षसवीरांस तेधवां तोरें ॥५॥
इकडे काशीराजा, आणि महोत्कट त्वरीत नगरींत ।
आले पौरजनांनीं, स्वागत केलें महोत्सवा करित ॥६॥
राजा येतो देखुन, प्रधान गेले तयास सामोरे ।
बहुविध पूजन केलें, प्रवेश करिती सु-वादनीं गजरें ॥७॥
पूजित विनायकाला, झाला सर्वांस फार आनंद ।
नगरींच्या नारी त्या, बघती राजास होत बहु मोद ॥८॥
कर्तव्यकर्म त्यजिलें, नारींनीं भूपतीस बघण्यासी ।
तेव्हां कुमारिकांनीं, लाह्या सुमनें सु-वर्षलीं बहुशीं ॥९॥
विप्रांस परब्रह्मच, क्षत्रीयांना तशाच वीर दिसे ।
वैश्यांत रुद्ररुपी, शूद्रांना तो हरीच भासतसे ॥१०॥
भावापरीच रुपें, दिसलीं सर्वांस त्या कुमाराचीं ।
ऐशा वेळीं तेथें, राक्षस दोघेच गुप्तरुपेंची ॥११॥
दंतुर विघंट नामें, आले राक्षस मुलांत खेळाया ।
म्हणती विनायकाला, चल चल बाळा त्वरीत खेळाया ॥१२॥
क्रीडा करितां करितां, आलिंगूं बाळ तें उभय ढोंगी ।
दाखवुं यमसदनींचा, मार्ग तया योजिती उभय ढोंगी ॥१३॥
जाणुन भाव तयांचा, आलिंगी पाहुणा उभय ढोंगी ।
केलें चूर्ण तयांचें, यमसदनीं पाठवी उभय ढोंगी ॥१४॥
राक्षस दोन निमाले, दशयोजन ते धरेवरी पडले ।
ऐसा प्रकार पाहुन, नगरींचे लोक विस्मयें दिसले ॥१५॥
पंतग विद्युत् दोघे, राक्षस धरिती रुपास वायूचे ।
मारावयास आले, आच्छादुनि ते रुपास वादळिंचें ॥१६॥
व्याकुळ झाले जन ते, वाडे झाडें बहूतशीं पडलीं ।
ऐसा प्रकार पाहुन, दाबुन कंठांस ते शवें केलीं ॥१७॥
साश्चर्य लोक झाले, म्हणती अवतार हा ऋषी पुत्र ।
रथ सरकला पुढें तो, राक्षस ’प्रवरा’ समान तो तत्र ॥१८॥
बैसे त्याला जाणुन, अंकुश हृदयीं त्वरीत सुत खुपशी ।
तेव्हां राक्षस मेला, गेला रथ भूप मंदिरापाशीं ॥१९॥
भूपें विनायकाला, पूजियलें तो बहूत सत्कारीं ।
विघ्न निवारित आले, ऋषिपुत्रासह त्वरीतसे नगरीं ॥२०॥