सौरी झाले बाई आत करू गत काई ।
बसवी झाले बाई आता भिन्नभेद नाही ॥ १ ॥
कासरा लावून सासरा दादला टाकून आले ।
आत्मलिंग पाहूनिया मदनमस्त झाले ॥ २ ॥
बांधून बुचडा उघडा माथा विभुतीचा पट्टा ।
आला गेला म्हटला नाही धरल्या चारी वाटा ॥ ३ ॥
उभी शिंदळ घाली गोंधळ हाचि लाभ मोठा ।
मागे पुढे पाहू नका वेगी काम लाटा ॥ ४ ॥
लहान थोर म्हटला नाही जाहले मी वेडी ।
एका जनार्दनी बसवी झाले परद्वार गोडी ॥ ५ ॥