मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
गोंधळ - निर्गुण निराकारे आदिमाते ...

भारुड - गोंधळ - निर्गुण निराकारे आदिमाते ...

भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

निर्गुण निराकारे आदिमाते मुळाधारे वो । अलक्ष सर्वेश्वरी चिदानंद अपरंपार वो । ब्रह्म तेजाकार महा कारण आकार वो अंबऋषी कैवारें नाम संसाराचें तारूं वो ॥ १ ॥

उदो बोला उदो बोला वैष्णवी माउलीचा वो ॥ध्रु०॥

शिवे वर दिधला असुर शंकासुर मातला वो । चतुरानन गांजिला वेद चारी घेउनी गेला वो । सुरपती त्रासिला तो तुजला शरण आला वो । तो त्वां सिद्धी नेला मीनरूपीं वध केला वो ॥ २ ॥

उदो म्हणा उदो मच्छाई माउलीचा वो ॥ध्रु०॥

सुरासुरांचे काळीं अवनीं अहंकारें दाटली वो । शेषें पृथ्वी धरली तंव ती पातळीं चालिली वो । ऐसें त्वां देखतां अंबे तुज करुणा आली वो । तैं त्वां कच्छरूपे पृथ्वी पृष्ठीवरी वाहली वो ॥ ३ ॥

उदो म्हणा उदो कुर्माई माउलीचा वो ॥ ध्रु०॥

असुर कुळीं मागुती मिळोनि केला अवनीं भार वो । मगर कूर्म भागलें जाणोनि घेसी तूं कैवार वो । अभिनव लीला तुझी केला सकळांचा संहार वो । तैं त्वां सूकररूपें दाढा लावुनि दिधला धीर वो ॥ ४ ॥

उदो म्हणा उदो वर्‍हाई माउलीचा वो ॥ध्रु०॥

असुरकुळीं जन्मला भक्त प्रल्हाद बोधिला वो । छंद तुझा लागला देखोनि पितयानें गांजिला वो । नामीं निर्भर झाला तैं त्वा स्तंभी उद्भव केला वो । दैत्य जानुवरी हिरण्यकशिपू विदारिला वो ॥ ध्रु० ॥

उदो म्हणा उदो नरसाई माउलीचा वो ॥ध्रु०॥

भेदोनी सुरनर लोक असुर गर्वीं झाला बळी वो । सुरपती शरण आला म्हणे राहे महीं तळीं वो । तैं त्वां वामनरूपें पृथ्वी तीन पदें व्यापिली वो । त्रिविक्रमाच्या रूपें त्वां बळी दडपिले पाताळीं वो ॥ ६ ॥

उदो म्हणा उदो वामनाई माउलीचा वो ॥ध्रु०॥

भृगुऋषीचे कुळी माते रेणुकेचें उदरी वो । अवतार घेतला परशुराम तूं सुंदरी वो । सहस्त्रार्जुन मारिला तो मातेच्या कैवारी वो । पृथ्वी एकविस वेळां फिरुनी निःक्षत्रिय संहारी वो ॥ ७ ॥

उदो म्हणा उदो परसाई माउलीचा वो ॥ध्रु०॥

पाहतां परात्पर पूर्ण रामाई अवतार वो । वनवासाच्या मिषें केला दुष्टांचा संहार वो । भानुकुळीं नांदसी नामें संसाराचें तारु वो । वधोनियां दशकंठ राज्यीं स्थापिला किंकरू वो ॥ ८ ॥

उदो म्हणा उदो रामाई माउलीचा वो ॥ध्रु०॥

नंद यशोदे घरीं गोंधळ गोकुळामाझारीं वो । अनंत लीला खेळसी तूं कान्हाई सुंदरी वो । बाळपणीं मारिला मामा कंसासुर वैरी वो । पांडव करूनी पुढें भार पृथ्वीचा उतरी वो ॥ ९ ॥

उदो म्हणा उदो कृष्णाई माउलीचा वो ॥ध्रु०॥

बोधोनि सकळही लोका बोधें नेलें त्रिविधताप वो । बौद्धरूपें नांदसी बोलेविना बोलणें एक वो । साधक बाधक जेथें एकपणेंचि अनेक वो । बौद्धे अवतार तुझ्या बोधाविण अनेक वो ॥ १० ॥

उदो म्हणा उदो बोधाई माउलीचा वो ॥ध्रु०॥

नाम कलंकी माता वेदा दावी साक्षेपता वो । भिन्नपणें भाविता भिन्नाभिन्न चढे हातां वो । व्यापक जे भाविती मजमाजीची तत्त्वतां वो । कुटिलपणें खेळसी भूली घालूनी फिरवी मज चित्ता वो ॥ ११ ॥

उदो म्हणा उदो कल्काई माऊलीचा वो ॥ध्रु०॥

एकचि माउली दहा अवतार खेळली वो । पाहतां गुरुवचनीं मज माजीच बिंबली वो । हरुनी त्रिविधताप साधुजनाला उद्धरी वो । एका जनार्दनीं सहजी सहजें ऐक्या आली वो । उदो म्हणा उदो दसविध माउलीचा वो ॥ध्रु०॥१२ ॥

N/A

N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP