जनी वनी एक जनार्दन दाता । त्यासी नमन करू आता रे ।
मन उन्मन जयासी पाहता । त्याच्या चरणावरी माथा रे ॥१॥
नाचत पंढरिसी जाऊ रे खेळिया । क्षराक्षरातीत पाहू रे ।
टाळ-मृदुंग मेळवूनि मेळा । गुरुवचनी खेळ खेळा रे ॥ध्रु॥
भक्ता वैराग्य कुंडले श्रवणी । ज्ञानांकुश मुकुटमणि रे ।
सप्रेम उटी चंदनाची । सत्वाची कास निर्वाणी रे ॥२॥
अष्टभावे खेळिया खेळताती ठायी । घागर्या वाजती पायी रे ।
दया क्षमा दोन्ही चवर्या ढाळती । शांती सत्रावी छाई रे ॥३॥
वाद निमाला शब्द खुंटला । त्रिभुवनी आनंद झाला रे ।
एका जनार्दनी शरण गेला । तो एकपण विसरला रे ॥४॥