ये रे कुत्तु ये । आम्हां विटाळ करूं नको । आपली भाकर घे । दे रे धन्या दे । विटाळ राहिला तुज खालीं । आवरून आपला घे । आतां हें कुत्रें मातलें । मीच म्हणूनी गुंतलें । फार कूस मोठी केली । जीवी तुझी खोटी झाली । उपाशीं मरतों पाहीं बरे । अमृताचें सारें । घर एक सकाळ काय खासी । तूंच मुद्दल कोठें राहसी । एवढे ज्ञान झालें कोठें । सद्गुरूचें देणें मोठें । सद्गुरु तुला आहे का रे । सर्वांघटी तोच कीं रे । आम्ही तर म्हणतों कुत्रा तुला । अविद्येनें धतोरा दिला । ब्राह्मणाशीं अविद्या म्हणशी । देहें ब्राह्मण कैसा होशी । श्रेष्ठ जन्म वेद बोलती । येवढे भले तरी कां मरती । हरिभक्त अमर होती । तें कळें कैसें । आपण व्हावें तैसें । होईनासी कां रे । जात गोत पाहिनाशी कीं रे । हें तुला ज्ञान कशानें झालें । एका जनार्दनीं गुरुकृपें कळों आलें ॥ १ ॥