पहिले कोठेच नव्हते काही ।
चंद्र सूर्य तारा नाही ।
अवघे शून्यच होते पाही ।
कानोबा तेरे तेरे ते ॥ १ ॥
येथे एक ढालगज निर्माण झाली ।
तिने पहा एवढी ख्याती केली ।
इंद्रादिकास म्हणे बाहुली ।
अमरपूरी तिची घरकुली ।
कानोबा तेरे तेरे ते ॥ २ ॥
ती मुळची कर्णकुमारी । तिचा बाप तो ब्रह्मचारी ।
तो जन्मला तियेचे उदरी । ऎसी पाहता नवलपरी ॥ ३ ॥ कानोबा
तिने बापची दादला केला । कोण वाईट म्हणे या बोला ।
अवघे तिच्याच बोलणे चाला । तरी कैवल्यसुख तुम्हाला ॥ ४ ॥ कानोबा
कानोबा तो तियेसी शिवला नाही । वांझ गर्भिण झाली पाही ।
व्याली पाच पंचवीस पोरे तिही । ऎसे तियेचे नवल पाही ॥ ५ ॥ कानोबा
ऎसी व्याली ते सकळ सृष्टी । न पडता भ्रताराच्या दृष्टी ।
एका जनार्दनी या गोष्टी । विचारा सद्गुरुच्या मुखी ॥ ६ ॥ कानोबा