मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
चिरंजीवपद - चिरंजीवीपद पावावयासी । अध...

भारुड - चिरंजीवपद - चिरंजीवीपद पावावयासी । अध...

भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

चिरंजीवीपद पावावयासी । अधिकार कैसा साधकासी । किंचित बोलेन निश्चयेंसी । कळावयासी साधका ॥ १ ॥

आधीं पहिजे अनुताप । तयाचें कैसें स्वरूप । नित्य मृत्यु जाणे समीप । न मनीं अल्प देह सुख ॥ २ ॥

म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला । तो म्यां विषय भोगी लाविला । थिता परमार्थ हातींच गेला । करीं वहिला विचार ॥ ३ ॥

ऐसा अनुताप वाहती चित्तां । वैराग्य ते त्याचिये हातां । त्या वैराग्याची कथा । किंचित आतां पैं बोले ॥ ४ ॥

तैं वैराग्य बहुतांपरी । आहे गा तूं अवधारीं । सात्त्विक राजस तामस त्रिप्रकारी । योगेश्वरी बोलिजे ॥ ५ ॥

राजस तामस त्याग । तेणें न कळे परमार्थ मार्ग । करावा सात्त्विक त्याग । सुख अव्यंग मग लाहे ॥ ६ ॥

प्रथम राजस तामस दोन्ही । अल्प बोलो उकलोनी । जें सात्त्विका लागोनी । अंतरींहुनी त्यागावा ॥ ७ ॥

नेणें वेदविधि विचार । नाहीं सत्संग सधर । कर्मभ्रष्ट साचार । तो अपवित्र तामस ॥ ८ ॥

त्याग कोला पूज्यतेकारणें । सत्संग सोडूनि पूज्यता भोगणें । शिष्य ममता धरून राहणें । तो जाणणें राजस ॥ ९ ॥

ऐसें वैराग्य राजस तामस । तो त्याग न माने संतांस । तेणें न भेटे कृष्ण परेश । अनर्थासी मूळ हें ॥ १० ॥

आतां वैराग्य शुद्ध सत्त्विक । जे जगद्वंद्य मानी यदुनायक । तें तूं सविस्तर ऐक । मनीं निष्टंक बैसावया ॥ ११ ॥

भोगेच्छा विषयिक । ते तो सांडी सकळिक । प्रारब्धें प्राप्त होतां देख । तेथुनी निष्टंक मन काढी ॥ १२ ॥

विषय पांच आहाती । ते अवश्य साधका नाडिती । म्हणोनी लागों न द्यावी प्रीती । कोणे रीती तें ऐका ॥ १३ ॥

जेणें धरिला शुद्ध परमार्थ । त्यासी जनमान हा अनर्थ । तेणे वाढे विषय स्वार्थ । ऐका नेमस्त विचार ॥ १४ ॥

नैराश्य पुरुष देखुनी । त्याची स्तुती करिती जनीं । एक सन्मानें करुनी । पूजेलागूनि पैं नेती ॥ १५ ॥

तंव त्याचे वैराग्य कोमळ कंटक । नेट न धरी निष्टंक । देखोनि मान स्तुती अलौकिक । भुलला देख पैं तेथें ॥ १६ ॥

जनस्तुती लागे मधुर । म्हणती हा उद्धरावया हरीचा अवतार । आम्हांलागीं जाहला स्थीर । धीर अपार शब्दगोडी ॥ १७ ॥

हा पाच विषयांमाजीं प्रथम । शब्द विषय उपक्रम । मग स्पर्शविषय संभ्रम । झोंबे परम त्या कैसा ॥ १८ ॥

नाना मृदु आसनें घालिती । विचित्र पर्यंक निद्रेप्रती । नरनारी आंग शुश्रुषा करिती । तेणें धरी प्रीती स्पर्शाची ॥ १९ ॥

रूप विषय कैसा गोंवी । वस्त्रें भूषणें देती बरवी । तेणें सौदर्य करी जीवीं । देहभावें श्लाघ्यता ॥ २० ॥

रूप विषय ऐसा जडला । मग रस विषय कैसा झोंबला । जैसें आवडे तें तयाल । गोड गोड अर्पिती ॥ २१ ॥

ते रस गोडी करितां । घडी न विसंबें धरी ममता । मग गंध विषय ओढिता । होय तत्त्वतां त्या कैसा ॥ २२ ॥

आवडे सुमन चंदन । बुका केशर विलेपन । ऐसें पांचही विषय संपूर्ण । जडले जाण सन्मानें ॥ २३ ॥

मग जे जे जन वंदिती । तेची त्याची निंदा करिती । परी अनुताप नुपजे चित्तीं । ममता निश्चितीम पूजकाची ॥ २४ ॥

म्हणाल जो विवेकी आहे । त्यासी जनमान करील काय । हें बोलणे मूर्खाचे पाहे । तया चाड आहे मानाची ॥ २५ ॥

ज्ञात्यासी प्रारब्ध गती । मान झाला तरी नेघो म्हणती । तेथेंचि गुंतोनी न राहती । उदास होती तात्काळ ॥ २६ ॥

यापरी साधकाच्या चित्ता । मान न सोडी सर्वथा । जरी कृपा उपजेल भगवंता । परी होय मागुता विरक्त ॥ २७ ॥

तो विरक्त कैसा म्हणाल । जो मानलें सांडी स्थळ । सत्संगीं राहे निश्चळ । न करी तळमळ मानाची ॥ २८ ॥

ऐसा परमार्थ साधकासी । जन मान्यता विघ्न त्यासी । तेणें लुब्ध विषयासी । या चिन्हासी बोलिजे ॥ २९ ॥

न मांडी स्वतंत्र फड । अंगीं अहंता येईल वाड । धरुनी जीवीकेची चाड । न बोले गोड मनधरणीं ॥ ३० ॥

नावडे लौकिक परवडी । नावडे लेणीं लुगडीं । नावडे परान्न गोडी । द्रव्य जोडी नावडे ॥ ३१ ॥

नावडे प्रपंच जनीं बैसणें । नावडें कोणाचें बोलणें । नावडे योग्यता मिरविणें । बरवें खाणें नावडे ॥ ३२ ॥

नावडे स्त्रियांते बोलणें । नावडे स्त्रियांतें पाहाणें । नावडे स्त्रियांचें रगडणें । त्यांचा स्पर्श नावडे ॥ ३३ ॥

नको नको स्त्रियांचा सांगात । नको नको स्त्रियांचा एकान्त । नको नको स्त्रियांचा परमार्थ । करती आघात पुरुषासी ॥ ३४ ॥

म्हणती गृहस्थ साधकें । स्त्रियां सांडुनी जावेकें । येच अर्थी उत्तर निकें । ऐक आतां सांगेन ॥ ३५ ॥

तरी स्वस्त्रीवांचुनी । नाताळावी अन्य कामिनी । कोणे स्त्रियेसी संनिध वाणी । आश्रय झणी न द्यावा ॥ ३६ ॥

स्वस्त्रीसही कार्यापुरते । पाचारावें स्पर्शावें निरुतें । परी आसक्त होऊं नये तेथें । अती सर्वथा न गुंतावें ॥ ३७ ॥

जरी स्त्रिया सेवा करिती । भक्ती ममता उपजविती । तरी त्यांच्या संगती । शुद्ध परमार्थी न बैसे ॥ ३८ ॥

अखंड एकांती बैसणें । प्रमदासंगे न राहणें । जो निसंगी निराभिमानें । त्या पैं बैसणें सर्वदा ॥ ३९ ॥

कुटुंब आहाराकारणें । अकल्पित न मिळे तरी कोरान्न करणें । ऐसें स्थिती जें वर्तणें । तें जाणणें शुद्ध वैराग्य ॥ ४० ॥

ऐशी स्थिती नाहीं ज्यासी । कृष्णप्राप्ती कैंची त्यासी । म्हणुनी कृष्णभक्तास । ऐशी स्थिती असावी ॥ ४१ ॥

या स्थितिवेगळा जाण । कृष्णीं मिळूं पाहे अज्ञान । सकळ मूर्खाचें तो अधिष्ठान । लटकें तरी आण देवाची ॥ ४२ ॥

हे बोलणें माझिये मतीचें । नव्हेति गा साचें । कृष्णें सांगितलें उद्धवा हिताचें । तें मी साचे बोलिलों ॥ ४३ ॥

साच न मानी ज्याचें मन । तो विकल्पें न पवे कृष्णचरण । माझें काय जाईल जाण । मी बोलोन उतराई ॥ ४४ ॥

साधावया वैराग्य जाण । मनुष्यदेही करावा प्रयत्‍न । सांगे एका जनार्दन । आणिक प्रयत्‍न असे ना ॥ ४५ ॥

N/A

N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP