सांड रांड गमजा नको करूं बोल । भक्तीविण ज्ञान गेलें कीती करिसी फोल ॥ १ ॥
जन्मा आली व्यर्थ गेली भक्ति नाहीं केली । माझें माझें म्हणोनियां गुंतोनिया मेली ॥ २ ॥
टिळा टोपी घालुनी माळा म्हणती आम्ही संत । परस्त्री देखोनियां चंचळ झालें चित्त ॥ ३ ॥
जगालागीं ज्ञान सांगे म्हणती आम्ही साधु । पोटीं दया धर्म नाही ते जाणावे भोंदु ॥ ४ ॥
संत म्हणतील निंदा केली निंदा नोहे भाई । शरण एका जनार्दनीं लागतसे पायीं ॥ ४ ॥