अहो तुम्ही संन्यासी झाला । काम क्रोध जवळींचा नाही गेला ।
व्यर्थ का विनाश केला । सावध होई ॥ १ ॥
संसार व्यर्थ सांडिला । मुला बाळा तुटी पाडिला ।
नारायण नाही जोडीला । सावध होई ॥ २ ॥
वर वर शेंडी बोडी । जानवे तोडून धोत्रे फाडी ।
हाती घेऊनी दंड लाकडी । सावध होई ॥ ३ ॥
वर वर म्हणसी नारायण । अंतरी विषयावरी ध्यान ।
कासया संन्यास घेऊन । सावध होई ॥ ४ ॥
आता एक विचार । धरी तू संताचा आधार ।
एका जनार्दनी तत्पर । सावध होई ॥ ५ ॥