संगीत हे बंध रेशमाचे
मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.
(६-५-१९६८). संगीत : जितेंद्र अभिषेकी
१
छेडियल्या तारा । ते गीत येइना जुळून
फुलते ना फूल तोच । जाय पाकळी गळून ॥धृ०॥
आकारून येत काही । विरते निमिषांत तेहि
स्वप्न चित्र पुसुनी जाय । रंग रंग ओघळून ॥
क्षितिजाच्या पार दूर । मृगजळास येइ पूर
लसलसते अंकुर हे । येथ चालले जळून ॥
२
आज सुगंध आला लहरत
येइ उपवनि माधवी
मी तेवि धुंद ।
मधुमासातील सूर नवे तैसा
हा वाटे आनंद माझा
३
विकल मन आज झुरत असहाय
नाहि मज चैन क्षण क्षण झुरति नयन
कोणा सांगू ?
ही चांदरात नीज नच त्यात
विरह सखि मी कुठवर साहू ?
४
का धरिला परदेश ?
सजणा का धरला परदेश ?
श्रावण वैरी बरसे झिरमिर, चैन पडेना जीवा क्षणभर
राहू कोठे ? राहू कैसी ? घेऊ जोगिन वेष ?
रंग न उरला गाली ओठी, भरती आसू काजळ काठी
शृंगाराचा साज उतरला मुक्त विखुरले केश !
५
काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी
मज फूलही रुतावे हा दैवयोग आहे ।
सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाची
चिरदाह वेदनेचा मज शाप हाच आहे ।
काही करू पाहतो रुजतो अनर्थ तेथे
माझे अबोलणेही विपरीत होत आहे ।
हा स्नेह वंचना की काहीच आकळेना
आयुष्य ओघळोनी मी रिक्त हस्त आहे ।
६
पंथ, जात, धर्म किंवा नातेहि ज्या न ठावे
ते जाणतात एक प्रेमास प्रेम द्यावे
ह्र्दयात जागणार्या अतिगूढ संभ्रमाचे
तुटतील ना कधीही हे बंध रेशमाचे ।
विसरुनी जाय तेव्हा माणूस माणसाला
जाळीत ये जगाला विक्राळ एक ज्वाला
पुसतात डाग तेही धर्मांध आक्रमाचे
सुटतील ना कधीही हे बंध रेशमाचे ।
हे बंध रेशमाचे ठेवीं जपून जीवा
धागा अतूट हाची प्राणात गुंतवावा
बळ हेच दुर्बळांना देतो पराक्रमाचे
तुटतील ना कधीहि हे बंध रेशमाचे ।
७
संगीत सर सुरस मम जीवनाधार
सूर, ताल, लय, धून
नटला विविध रंगी स्वररूप ओंकार !
आनंद घन असा बरसे नभातून
हा वेद श्रुतिसमान सुखसार !
संगीत रस सुरस मम जीवनाधार !
८
दैव किती अविचारी !
ऊधो ! जीवनगति ही न्यारी ॥धृ०॥
शुभ्र वर्ण बगळ्यास दिला तू
कोकिळ तनु अंधारी धृ
कृष्ण लोचन सुंदर हरिणे
वनि वनि भ्रमति बिचारी ! ॥
मूर्ख भोगितो राजवैभवा
पंडित फिरत भिकारी
सूरदास विनवितो प्रभूला
क्षण क्षण हो जडभारी ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP