संगीत सुवर्णतुला
मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.
(१०-१०-१९६०). संगीत : छोटा गंधर्व
२
उजळित जग मंगलमय अरुणबिंब आलें
सोनेरी किरणांनी भू-मंडळ न्हालें ॥धृ०॥
देव हा प्रकाशमान
त्यास देति मुनिहि मान
अर्घ्यदान मंत्रगान करुनि शांत झाले ॥
नलिनी-दल- आलिंगन
त्यजुनि भृंग करि गुंजन
कुंज कुंज मोहरले वन-विहंग बोले ॥
रविराया पूजाया
काय फुलें होउनियां
गगनीचे तारांगण धरणीवर आले ? ॥
३
पारिजात फुलला । अंगणीं पारिजात फुलला
बहर तयाला काय माझिया प्रीतीचा आला ॥धृ०॥
धुंद मधुर हा गंध पसरला
गमलें मजला मुकुंद हंसला
सहवासातुर मदिय मनाचा कणकण मोहरला ॥
४
रागिणी-मुखचंद्रमा
उजळिं ह्रदयीं पूर्णिमा ॥
कोपतां खुलतो कसा
वदन-शशिचा लालिमा ॥
रूप बघुनी लज्जिता
होति पूर्वा-पश्चिमा ॥
५
येतिल कधिं यदुवीर-सखये ।
मानस होत अधीर ॥धृ०॥
कटु वदलें मी, रुसवा केला
म्हणुनि जिवाचा जिवलग गेला
सोडूनि हें मंदिर ॥
विरहाचा वैशाख तापला
शांत सुशीतल चंद्र लोपला
कोठें धीर समीर ? ॥
६
तुजला वंचियलें श्रीहरिनें ।
कपट तयाचें नाहि उमगलें ॥धृ०॥
लटकी माया, प्रेमहि लटकें ।
साच तुला गे मृगजळ गमलें ।
७
रतिहुन सुंदर मदन-मंजिरी ! मदनाचें वरदान तुला ॥धृ०॥
ललित कोमला तव सुंदरता लाजविते मंदार-फुला
बघुनि तुला गगनांत खंगते कलेकलेनें चंद्रकला
कळे न मजला, वृथा फुलाचा, नाद कशाला हवा तुला ॥
८
गगनमणि सूर्य हा
रजनीपति चंद्र तो
एक निमिषांतरी
सहज तो निर्मितो ॥
तोचि विश्वंभर । विश्वाचा आधार
करि दैन्य दूर । नारायण
देव नारायण । दयेचा सागर
होतसे साकार । भक्तांसाठी ॥
देतसे भक्तिला । मुक्तीचा सोहळा
भावाचा भुकेला । भगवंत ॥
९
फुलला मनीं वसंत बहार ।
मुनिवर्याच्या कृपाप्रसादे नुरला चिंताभार ॥धृ०॥
उदासवाणा शिशिर संपला
वासंतिक मधुगंध पसरला
धुंद निनादे चैतन्याचा मनिं पंचम झंकार ।
१०
नारायण । नारायण । नाम तुझे अति पावन ॥धृ०॥
कमलापती कमल नयन । भयहारण-भवतारण-नारायण ।
तूं धरणी तूंच गगन । तूंच आप तेज पवन ।
तूं स्थिति-लय, रजनी-दिन ।
तूच कार्य तू कारण - नारायण ।
११
धीर धर भामिनी । ठेव श्रद्धा मनीं ॥धृ०॥
सत्वरी भेटेल श्रीरंग यदुमणि
सफल मन कामना करिल गुण-शालिनी
प्रकट होईल गे सौख्य मंदाकिनी ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP