२०-२-१९१९
१
संगीत : गंधर्व नटमंडळी आणि बाई सुंदराबाई
(राग : यमन, ताल : त्रिवट, चाल : येरी आयी पिया बिन)
लागे ह्रदयीं हुरहुर । अजि ।
सुखविषय गमति नच मज सुखकर ॥धृ०॥
कांहीं सुचेना । कांहीं रुचेना ।
राहि कुठें स्थिर मति नच पळभर ॥१॥
२
(राग : बिहाग, ताल : त्रिवट, चाल : टेर सुनी पाये)
बेध तुझा लागे सतत मनी । वसतिच केली नामे वदनी ॥धृ०॥
जगतं सकल सखि भासत त्वन्मय । मधुर रूप तव खेळे नयनी ॥१॥
३
(राग : भूप, ताल : एकताल, चाल : रतन रजक कनक)
परम गहन ईशकाम । विश्वा जरी पुण्यधाम ।
मनुजा तरी गूढ चरम । चिर अभेद्य साचे ॥धृ०॥
क्रीडा दैवी विराट । मनुजसृजन क्षुद्र त्यात ।
मानुषी मनीषा । गणन काय याचे ? ॥१॥
४
(राग : भीमपलास, ताल : तेरे बलमा बलमा)
छळिती या ह्रदया अदया । भ्रांत नमोरचना कालगुणा ॥धृ०॥
मातृजीवन झिजवुनि जगती । अंती घेती तयासह त्या निधना ॥
५
(राग : काफी जिल्हा, ताल : त्रिवट, चाल : इतना संदेसवा)
दहती बहु मना नाना कुशंका विपदा विकट घोर ।
निकटी विलोकी । मन कंप घेत । गणि ते ना विवेका ॥१॥
६
(राग : खमाज जिल्हा, ताल : पंजाबी, चाल : मै तोसे नाही बोलूं रे)
शंकाहि नाही कालिं ज्या । दुर्गति जवें ये सदा ।
धूर्त कपटि अरी । जैसा रण करी । तेवि विद्या ही सदा ॥१॥
७
(राग : शंकरा, ताल : त्रिवट, चाल : सो जानी री नारी)
संसारि विषारी तीव्र सत्यें । अमृत होती । कृतिनें कान्त ॥धृ०॥
दिव्य रसायन । संकटांतकी । सत्यपरिचयें । क्षणि असुखान्त ॥१॥
८
(राग : भैरवी, ताल : पंजाबी, चाल : बाबुला मोरा)
गुणगंभीरा । त्यजि न लव धीरा ॥धृ०॥
सत्त्वपरीक्षा महा । यदा परमेश्वर नियोजी ।
अवसाद तेथवां उचित का वीरा ॥१॥
९
(चाल : विडा घ्या हो नारायणा)
घास घेरे तान्ह्या बाळा । गोविंदा गोपाळा ।
भरवी यशोदामाई । सांवळा नंदबाळ घेई ॥धृ०॥
घेई कोंडा-कणी त्रैलोक्याचा धनी ।
विदुराघरींचा । पहिलावहिला घास ॥१॥
पोहे मूठभरी । क्षीराब्धीच्या हरी ।
मंत्र सुदामजीचा । आला दुसरा घास ॥२॥
थाळी एक्या वेठी । घ्यावी जगजेठी ।
द्रौपदीचा । आला तिसरा घास ॥३॥
उरल्या उष्टावळी । फळांच्या वनमाळी ।
शबरी भिल्लिणीचा । घ्या हो चवथा घास ॥४॥
टाकून ओवाळून । मुखचंद्रावरून ।
गोविंदाग्रजाचा । उरला सुरला घास ॥५॥
१०
(राग : बिलावल)
वसुधातल रमणीय सुधाकर । व्यसनघन तिमिरी बुडविसी कैसा ॥धृ०॥
सृजनी जया परमेश सुखावे, नाशूनी त्या तुजसी मोद नृशंसा ।
११
(राग : अडाणा, ताल : त्रिवट, चाल : मुंदरी मोरी का)
झणिं दे कर या दीना । प्रेमजलातुर मृतशा दे जल ते या मीना ॥
वांछा तरी उपकार मधूच्या । या करि संतत पाना ॥१॥
१२
(राग : गरुडघ्वनि, ताल : त्रिवट, चाल : परब्रह्यो रघु)
ललनामना नच अघलवशंका अणुहि सहते कदा ॥
सृजनि त्यांच्या विधि तरल घे विमल प्रकृतिसी पुण्य परम ॥१॥
१३
(राग : जिल्हा मांड, ताल : कवाली, चाल : पिया मनसे)
दयाछाया घे निवारुनीया, प्रभु मजवरि कोपला ॥
जीवनासि मम आधार गुरू जो । तोहि कसा अजि लोपला ॥१॥
१४
(राग : तिलक कामोद, ताल : एकताल, चाल : अब तो लाज)
प्रणतनाथ । रक्षि कान्त । करि तदीय असुख शांत ।
अशुभा ज्या जोजिं दैव । पतिंलागीं त्या सदैव ।
परिणमवी मंगलांत ॥१॥
१५
(राग : मांड-गर्बा, ताल : दादरा, चाल : गोकुलमा लई)
मानस का बधिरावें है ? बघतसे खिन्न जगता ॥
गृहशृंखला या । दृढ बद्ध पाया । बल ना भेद तया होता ॥१॥
१६
(राग : खमाज, ताल : त्रिवट, चाल : सनक मुख विनुत)
प्रणय जरि भंगला । तरि नर जगता मुकला ॥
घोर निरयसम । त्यासि विकट जग ।
दीर्घ जीवित शापचि खरा तयाला ॥१॥
१७
(राग : वसंत, ताल : त्रिवट, चाल : जपिये नाम जाकोजी)
गणिसी काय खल माते, अलंकार केवळ कुजनांते ।
न विश्वासलव योग्य जयाते ॥१॥
वद का स्मरसी चिरसहवासी । घडली कृति अनुचित या हाते ।
जनकधर्म कधी त्यजि काय सुते ॥२॥
१८
(राग : पहाडी, ताल : त्रिवट, चाल : माने नाही सैय्या)
लोटु नका कान्ता । अशी दुरी कान्ता ।
केंवि जगें दीना मीना । जललवरहिता ॥
हेचि चरण माझे । जीवन जगतीं ।
मृतचि गणा मज हे दुरी होतां ॥१॥
१९
(राग : काफी-जिल्हा, ताल : कवाली, चाल : कत्ल मुझे कर)
सत्य वदे वचनाला । नाथा । स्मरुनि पदांला या सुरविमला ॥१॥
वित्त परार्जित मानी विषसम । स्पर्शिन ना कधि मी त्याला ॥२॥
२०
(राग : पहाडी-गज्जल, ताल : धुमाळी, चाल : दिल बेकरार तूने)
कशि या त्यजू पदाला । मम सुभगशुभपदांला ।
वसे पादयुग जिथें हे । मम स्वर्ग तेथ राहे ॥
स्वर्लोकिं चरण हे नसती । तरी मजसि नियवसती ती ।
नरकाहि घोर सहकांता । हो स्वर्ग मला आतां ॥१॥
२१
(राग : बेहागडा, ताल : त्रिवट, चाल : चरावत गैया)
जगी हसतभागा । सुखि चिर असुख ॥धृ०॥
जनके त्यजिता । लाधे दुसरा ।
या विनाश त्या । माते जिधि विधि विमुख ॥१॥
२२
(राग : मालकंस, ताल : झपताल, चाल : त्याग वाटे सुलभ)
सोडि नच मजवरी वचनखरतशरां ।
दग्ध करिसी तयें हाय । मम अंतरा ॥धृ०॥
स्मृति काय पूर्विची । लोपली आजची ।
केवि तव मति रचि । कल्पना भयकरा ॥१॥
२३
(राग : बागेश्री, ताल : त्रिवट, चाल : गोरे गोरे मुख)
मानभंग दाही । मृतशा ह्रदया ॥धृ०॥
दग्ध वल्लरी जाळी । चंचला अदया ॥१॥
गतपतितांचे जीवन । जगती वाया ॥२॥
२४
(राग : कालिंगडा, ताल : दीपचंदी, चाल : छुपनापे रंग)
बघु नको मजकडे केविलवाणा, राजस बाळा ॥धृ०॥
जये देवा । आपुली ना करुणा ।
तोंवरी समजुनी । वर्ते अनुकाला ॥१॥
२५
(राग : पहाडी-गज्जल, ताल : कवाली, चाल : खडा कर)
असे पति देवचि ललनांना । तयासी अन्य भावना ना ॥
स्पर्शमणि वनितामन साचे । करित जे कांचन लोहाचे ॥
स्वपतिच्या अंगिच्या दोषा । गणिति गुण मधुर आर्ययोषा ॥
स्वपतिच्या अंगिच्या दोषा । गणिति गुण मधुर आर्ययोषा ॥
तयासह नरकयातनांला स्वर्गसुख । मनिं समजति अबला ॥
असे जो प्रस्तर जननयनी । गणी त्या ईशचि तद्रमणी ॥
वसुनि त्या या देवानिकटी । ईशपद लभति सपति अंती ॥
२६
(राग : पहाडी-गज्जल, ताल : धुमाळी, चाल : दिल बेकरार तूने)
मज जन्म देइ माता । परि पोशिलें तुम्ही ॥
निजकन्यका गणोनी । न कांहीं केले कमी ॥धृ०॥
उपकार जे जहाले । हिमाद्रितुंगसे ।
शत जन्म घेऊनी ते । फेडीन काय मी ॥१॥
सदया मनासि ठेवा । आपुल्या असे सदा ।
उपकारबद्ध तनया । तुमची पदें नमीं ॥२॥
२७
(राग : भैरवी, ताल : केरवा, चाल :ज गा गोरी ननदी)
प्रभु अजि गमला । मनीं तोषला ॥धृ०॥
कोपे बहु माझा । तो प्रभुराजा
आतां हांसला । मनीं तोषला ।
मृतचि ह्रदय होते नाथ, हे पूर्ण झाले ।
परि वचनसुधेने त्यासि जिवंत केलें ॥
अमृतमधुर शब्दां त्या पुन्हां ऐकण्यातें ।
श्रवणि सकल माझी शक्ति एकत्र होते ॥१॥