गज्जलाञ्जलि - गोरी सलील सुन्दर तू भेटता...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
गोरी सलील सुन्दर तू भेटतां कुमारी
वाटे भवीं अजूनिहि आहे जरा खुमारी.
दैवें दगा दिला जरि कित्येकदा तयाला
अन्तीं कुबेर होऊन मानी मनीं जुगारी,
मी धाडशी सदोदिता लावीं पणास सारें,
आशेवरी विसम्बुनि हातांतलें झुगारीं.
स्वप्नांवरी तरङगत गुङगींत जन्म जाऊ;
निश्चिन्त मी असावध, फुडको कुणी तुतारी !
हो स्वर्गलाभ भूवर, हो सर्वनाश किंवा,
माला पडो शिरावर किंवा पडो कुठारी !
जाती सुवर्ण - मध्यम - पन्थेंच हे शहाणे.
प्रेमांत हेंच केवळ सौभाग्य - बेसुमारी ?
तूझें घडूनि दर्शन मी प्रेममत्त झालों.
वैराग्य केवि आदरुं ? का प्रेम हें न तारी ?
राजर्षि तोहि मोहित हो मेनका - कटाक्षें,
तूझ्यापुढे टिके नच ही पुस्तकी हुशारी !
जाळ्यांत येऊ सावज हा दोष आमिषाचा,
दोषास पात्र या तव सौन्दर्यजादुगारी,
राजर्षि घालवी तप, कोणी मुके जिवाला,
सर्वस्व ठेविलें बघ मीही तुझ्या पुढारीं.
हे चारूगात्रि, भीति न होऊल काय याची;
हे देवते, तुझी कृति होऊल चारु सारी.
१३ नोव्हेम्बर १९२२
Last Updated : November 11, 2016
TOP