प्रेमस्वरूप आऊ ! वात्सल्यसिन्धु आऊ !
बोलावुं तूज आता मी कोणत्या ऊपायीं !
तू माय, लेकरूं मी; तू गाय, वासरूं मी;
ताटातुटि जहाली आत कसें करूं मी ?
गेली दुरी यशोदा टाकूनि येथ भुका ना ?
अन राहिला कधीचा तान्हा तिचा भुका ना ?
तान्हय़ास दूर ठेवी - पान्हा तरीहि वाहे -
जाया सती शिरे जी आगींत, शान्त राहे;
नैष्ठुर्य त्या सतीचें तू दाविलेंस माते,
अक्षय्य हृत्प्रभूचें सामीप्य साधण्यातें.
नाही जगांत झाली आबाळ या जिवाची,
तूझी कुणीव चित्तीं आऊ, तरीहि जाची,
चित्तीं तुझी स्मरेना काहीच रूपरेखा,
आऊ हवी म्हणूनी सोडी न जीव हेका,
विद्याधनप्रतिष्ठा लाभे अता मला ही.
आऊविणे परी मी हा पोरकाच राहीं.
सारें मिळे परन्तू आऊ पुन्हा न भेटे,
तेणे चिताच चित्तीं माझ्या अखण्ड आठवे गे !
आऊ, तुझ्या वियोगें ब्रम्हाण्ड आठवे गे !
कैलास सोडूनी ये ऊल्केसमान वेगें.
किंवा विदेह आत्मा तूझा फिरे सभोती,
अव्यक्त अश्रुधार की तीर्थरूप ओती !
ही भूक पोरक्याची होऊ न शान्त आऊ,
पाहूनिया दुज्यांचें वात्सल लोचनांहीं.
वाटे ऊथूनि जावें, तूझ्यापुढे निजावें.
नेत्रीं तुझ्या हसावें, चित्तीं तुझ्या ठसाचें ‘!
वक्षीं तुझ्या परी हें केव्हा स्थिरेल डोकें,
देऊल शान्तवाया हृत्स्पन्द मन्द झोके ?
घे जन्म तू फिरूनी, येऊनी मीहि पोटीं,
खोटी ठरो न देवा, ही ऐक आस मोठी !
१७ सप्टेम्बर १९२१